प्रतिनिधी/ मडगाव
गोमंतकीय टॅक्सीचालक हे खरे भूमिपुत्र असून त्यांना टॅक्सीसाठी मोफत मीटर बसवून देण्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर तसेच सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मान्य केले होते. आपण या घडामोडीचा साक्षीदार असून सरकारने हे आश्वासन पाळावे, अशी मागणी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी उचलून धरली आहे.
शुक्रवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मागणी उचलून धरली. तारांकित रिसॉर्टपासून व्यवसाय करणारे आपल्या मतदारसंघातील टॅक्सीचालक आपल्याकडे कैफियती घेऊन येत असतात. आपण काही वेळा त्यांची माजी मुख्यमंत्री स्व. पर्रीकर यांच्याशी भेट घडवून आणली होती. त्यावेळी टॅक्सीचालकांना डिजिटल मीटर बसविण्याची सक्ती करण्यात येत होती. तेव्हा मोफत मीटर बसवून देण्यास पर्रीकर राजी झाले होते, असे ते म्हणाले. यासंदर्भात नुकतेच मंत्री मायकल लोबो यांनी केलेले विधान खरे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांनी गोमंतकीय टॅक्सीचालकांवर अन्याय करण्यात येणार नसून मोफत मीटर देण्यासाठी आवश्यक पावले उचलणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सरकारने कृती करावी, अशी मागणी त्यांनी केली.
परवाने रद्द करणे बंद करा
काही टॅक्सीचालकांचे दिलेल्या मुदतीत मीटर न बसविल्यामुळे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ही बाब योग्य नसून कोविड महामारीच्या काळात व्यवसाय नसल्याने टॅक्सी व्यवसाय ठप्पच झाला होता. काही जणांवर उपासमारीची पाळी आली होती. त्यात आर्थिक फटका बसलेल्यांना मीटर बसविणे शक्मय झाले नसावे. त्यामुळे सरकारने सक्तीची पावले उचलताना परवाने रद्द करणे चुकीचे आहे. हा प्रकार बंद करावा, अशी मागणी आलेमाव यांनी केली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. पर्रीकर यांनी टॅक्सीचालकांकडून वापरल्या जाणाऱया खूप महाग गाडय़ांना जास्त दर देण्याचेही आश्वासन दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भूमिपुत्र अधिकारिणी विधयकाला आपण विरोध दर्शविला असून राज्यपालांना यासंदर्भात आपण पत्र लिहिले आहे. सदर पत्र देण्यास आपण गेलो होतो. मात्र राज्यपालांची भेट न झाल्याने ते देऊ शकलो नाही. लवकरच राज्यपालांची भेट घेऊन आपण आपला विरोध त्यांना कळविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कळंगूट किनाऱयावर मृतावस्थेत सापडलेल्या मुलीची अर्धनग्न छायाचित्रे समाजमाध्यमांवरून सध्या व्हायरल होत असल्याचे पाहून आपले मन खिन्न होते. महिला ही एखाद्याची बहीण, बायको, मुलगी असू शकते. हे डोळय़ांसमोर ठेवून अशी छायाचित्रे फॉरवर्ड करताना विचार करायला हवा, असे सांगून आलेमाव यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.