दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा : गोव्यातील 25 हजार टॅक्सीव्यावसायिकांनी ‘आप’ला साथ द्यावी

प्रतिनिधी /वास्को
गोव्यात आम आदमीचे सरकार आल्यास गोव्यातील टॅक्सीचालक तसेच ऑटो रिक्षा व्यावसायिकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा आपचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. हे महामंडळ टॅक्सीव्यावसायिकांना पूर्ण न्याय देणार असून टॅक्सीव्यावसायिकच या महामंडळाचे निर्णय घेतील. टॅक्सीव्यावसायिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाने टॅक्सीव्यावसायिकांविरोधात दिलेल्या निर्णयाला येत्या आठ दिवसांत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशीही घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दाबोळी मतदारसंघातील नवेवाडे येथील जय संतोषी माता संस्थानच्या हॉलमध्ये खास टॅक्सीव्यावसायिकांसाठी आम आदमी पार्टीने बुधवारी दुपारी सभेचे आयोजन केले होते. या सभेत टॅक्सीव्यावसायिकांची विशेष अशी उपस्थिती दिसून आली नाही. मात्र, यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गोव्यातील टॅक्सीव्यावसायिकांवरील अन्याय दूर केला जाईल, असे स्पष्ट करून त्यांच्यासाठी विविध घोषणाही केल्या. यावेळी व्यासपीठावर आम आदमी पार्टीचे गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे, प्रेमानंद नाणोस्कर, पुती गांवकर, संदेश तळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गोव्यातील राजकारणीच खरे माफिया
गोव्यातील टॅक्सीवाल्यांना माफिया संबोधणे चुकीचे असून माफिया ही उपमा देण्यापूर्वी येथील कार्यपद्धती समजून घ्यायला हवी. गोव्यातील राजकारणीच खरे माफिया आहेत. गोव्यातील व्यावसायिक हे पीडित आहेत. काँग्रेस व भाजपाने त्यांना पिळलेले आहे. त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. खाण क्षेत्रात, आरोग्य सेवा क्षेत्रात अशा सर्वच क्षेत्रात या पक्षांनी गोव्याला लुटलेले आहे. या अन्यायाविरुद्ध आम्हा सर्वांना मिळून लढावे लागणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. गोव्यातील टॅक्सीव्यावसायिक, रिक्षा व्यावसायिकांसाठी आम्ही गोव्यात सत्तेवर आल्यास महामंडळाची स्थापना करू. हे महामंडळ टॅक्सी व्यावसायिकांचेच असेल. तेच हे महामंडळ चालवतील. तेच धोरण ठरवतील. तेच आपल्या व्यवसायाचा दर ठरवतील. टॅक्सींसाठी ऍप असावा की नाही हे टॅक्सीव्यावसायिकच ठरवतील. टॅक्सीचालकांना एखादा अपघात झाल्यास सरकारकडून मोफत उपचार केले जातील. राजकारण्यांना या महामंडळाच्या व्यवहारात स्थान असणार नाही. दिल्लीत आम्ही हे करून दाखवलेले आहे, असे केजरीवाल म्हणाले. गोव्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करू. टॅक्सीव्यावसायिकांना वाहतूक खात्यात वारंवार फेऱया माराव्या लागणार नाहीत. लाचलूचपत बंद होईल. सेवा ऑनलाईन होईल. गोव्यातील टॅक्सीव्यावसायिकांच्या विरोधात उच्च न्यायालयाने टॅक्सी मीटरसंबंधी निर्णय दिलेला आहे. या आदेशाला येत्या आठ दिवसांत आपतर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशीही घोषणा केजरीवाल यांनी या सभेत केली.
दिल्लीत टॅक्सीव्यावसायिकांना आपची साथ
सात वर्षांपूर्वी दिल्लीत टॅक्सीव्यावसायिकांची स्थिती अशीच होती. आम आदमी पार्टीने त्यांना साथ दिली. त्यामुळे टॅक्सीव्यावसायिक आम आदमी पार्टीच्या पाठीशी राहिले. दिल्लीत आपचे सरकार स्थापन होण्यात 70 टक्के वाटा टॅक्सी व्यावसायिकांचाच होता, असे केजरीवाल यांनी नमूद केले. ते म्हणाले की, गोव्यात पंचवीस हजार टॅक्सीव्यावसायिक असून त्यांनी एकत्र यावे व आम आदमी पार्टीला साथ द्यावी, असे आवाहनही केजरीवाल यांनी केले.
भंडारी समाज मुख्यमंत्र्यांचा केजरीवालांकडून पुन्हा नारा
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या सभेत भंडारी समाजाचाच मुख्यमंत्री असा नारा पुन्हा दिला. काँग्रेस व भाजपाने गोव्यात भंडारी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केलेला आहे. सर्वात मोठा समाज असलेल्या या समाजाचा मागच्या साठ वर्षात केवळ एकदास आणि तोही केवळ अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनलेला आहे. गोव्याच्या राजकारणात भंडारी समाजावर अन्याय झालेला आहे. भंडारी समाजसुद्धा इतर समाजांप्रमाणेच सक्षम असून त्यांच्यातही गुणवत्ता आहे. सर्व क्षेत्रात या समाजाने यश प्राप्त केलेले आहे. आम आदमी पार्टी जातीयवाद करीत नसून भाजप आणि काँग्रेस पक्षच जातीयवाद करीत आहेत, असे केजरीवाल म्हणाले.