इटलीत 100 फूट उंच टॉवरवर डिनर करू शकतील पर्यटक
चालकरहित ड्रोन हॉटेलमधून टॉवरपर्यंत पोहोचविणार
आलिशान डिनर करण्याचे शौकीन असणाऱया लोकांसाठी इटलीमध्ये 100 फूट उंचीचा इको टॉवर लवकरच तयार करण्यात येणार आहे. हिरवाई आणि सरोवरादरम्यान निर्माण होणाऱया टॉवरवर पर्यटक डिनर तसेच लंच करू शकीतल. येथे पोहोचण्यासाठी ड्रोन तैनात असतील, जे पर्यटकांना हॉटेलवरुन थेट टॉवरच्या छतावर पोहोचवतील. टॉवरचे नाव वर्टीपोर्ट्स ठेवय्ण्यात आले आहे. याची छायाचित्रे इटलीच्या कंपनीने प्रसिद्ध केली आहेत.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इटलीची ही नवी योजना आहे. हा प्रकल्प रोममधील गियानकार्लो जेमा डिझाइन ग्रूपचा आहे. या प्रकल्पासाठी एअर टॅक्सी तयार करणाऱया हँग होल्डिंग या चिनी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. दोन्ही कंपन्या मिळून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
हॉटेलपर्यंत सोडणार ड्रोन
प्रकल्प अहवालानुसार जेवण झाल्यावर पर्यटकांना हॉटेलपर्यंत सोडण्याचे काम हेच ड्रोन म्हणजेच एअर टॅक्सी करणार आहेत. हा टॉवर आफ्रिकेतील दीर्घायू असलेल्या बाओबाब वृक्षापासून प्रेरित आहे. टॉवर तयार करण्यासाठी लॅमिनेटेड लाकूड आणि स्टीलचा वापर करण्यात येईल.
ड्रोन्सला चार्ज करणार टॉवर

टॉवरमध्ये एक कॅफे, एक प्रतीक्षा कक्ष आणि 2053 चौरस फुटांचे पेनोरेमिक रेस्टॉरंट असणार आहे. तेथे सेंट्रल लिफ्टद्वारे पोहोचता येणार आहे. इको प्रेंडली टॉवरच्या छतावर लावण्यात येणाऱया सौरघटांमधून 300 किलो वॅट वीज एका दिवसात तयार करता येईल. ड्रोनला याच टॉवरद्वारे निर्माण करण्यात आलेल्या वीजेतून चार्ज केले जाणार आहे.
अन्य ठिकाणीही प्रकल्प
वर्टीपोर्ट्स शहरांमध्ये एअर मोबिटिली मार्केट तयार करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे चिनी कंपनीने म्हटले आहे. टॉवर कुठे उभारला जाणार याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण इटलीसह युरोप आणि दक्षिणपूर्व आशियातही असे टॉवर निर्माण करण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.