वृत्तसंस्था/ टोकियो
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत दर चार वर्षानी नव्या क्रीडा प्रकारांची भर घातली जाते. यावेळी होणाऱया ऑलिम्पिकमध्ये चार नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून एकूण 339 पदके मिळविण्यासाठी क्रीडापटूंमध्ये चुरस लागणार आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास यावेळची स्पर्धा ही आजवरची सर्वात मोठी ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे.
कोरोना महामारीचा फटका बसलेल्या या ऑलिम्पिकमध्ये पाच क्रीडाप्रकारांना स्थान देण्यात आले असून त्यापैकी चार प्रकार ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करीत आहेत. स्पर्धा सुरू होण्यास चार दिवसांचा अवधी राहिला असून यावेळी पाच क्रीडाप्रकारातील पाच नवे ऑलिम्पिक चॅम्पियन पहावयास मिळणार आहेत.

1) स्केटबोर्डिंग ः भरपूर ऍक्शनने युक्त असलेल्या या क्रीडाप्रकाराचा ऑलिम्पिक चळवळीत पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. 2024 मध्ये होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये याला याआधीच सामील केल्यामुळे त्याला संजीवनीच मिळाली आहे. येथील स्पर्धेत स्केटबोर्डिंगमध्ये पार्क व स्ट्रीट असे दोन प्रकार होणार आहेत. पार्कमधील प्रकारात स्केटर्सना घुमटाच्या आकाराच्या बाऊलमध्ये आपले कौशल्य सादर करावे लागणार आहे. स्ट्रीटमधील प्रकारात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष जीवनात येणाऱया रेल्वे लाईन, पायऱया यासारख्या अडथळय़ांना स्पर्धकांना पार करावे लागणार आहेत. अरियाके अर्बन स्पोर्ट्स पार्क येथे ही स्पर्धा होणार आहे. ब्राझीलचा पेड्रो बॅरोस, ऑस्ट्रेलियाचा शेन ओनील, ब्राझीलचा लेटिसिया बुफोनी, इटलीचा ऍलेक्स सॉरगेन्ट, जपानचा युतो होरिगोम व आओरी निशिमुरा, ब्रिटनचा 12 वर्षीय स्काय ब्राऊन ही बडी नावे या क्रीडा प्रकारात खेळताना दिसतील.
2) सर्फिंग ः हा आणखी एक साहसी ऍक्शनपॅक्ड क्रीडाप्रकार असून त्याचेही या स्पर्धेत पदार्पण होत आहे. याशिवाय पॅरिस ऑलिम्पिकसाठीही त्याला मान्यता देण्यात आली आहे. पुरुष व महिला विभागात स्पर्धा होणार असून प्राथमिक फेरीनंतर बाद फेरी घेतली जाणार आहे. ही स्पर्धा इचिनोमिया येथील त्सुरिगासाकी बीचवर होणार आहे. ब्राझीलचा गॅबिएल मेदिना, अमेरिकेचा माजी वर्ल्ड चॅम्पियन जॉन जॉन फ्लॉरेन्स, अमेरिकेचीच कॅरिसा मूर, ऑस्ट्रेलियाची सातवेळची वर्ल्ड चॅम्पियन स्टेफनी गिल्मोर व स्थानिक कॅनोआ इगाराशी या टॉप पाच खेळाडूंचे कौशल्य येथे पहावयास मिळणार आहे.
3) क्लायम्बिंग ः 80 च्या दशकात या क्रीडा प्रकाराला ओळख मिळू लागली आणि यावेळी प्रथमच त्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या खेळाची लोकप्रियता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. अलीकडच्या युवा खेळाडूंत हा क्रीडाप्रकार जास्त लोकप्रिय झालेला आहे. टोकियोतील आओमी अर्बन स्पोर्ट्स पार्क येथे ही स्पर्धा एकेरीत घेतली जाईल. यामध्ये स्पीड, बोल्डरिंग व लीड असे तीन मुख्य प्रकार असून त्यांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे पुरुष व महिला विजेते ठरविण्यात येणार आहेत. झेकचा ऍडम ओंद्रा, याना गार्नब्रेट (स्लोव्हेनिया), मिहो नोनाका (जपान), फ्रान्सचे मायकेल व बासा मावेन बंधू, शॉना कॉक्से (ब्रिटन) हे या प्रकारातील प्रमुख खेळाडू आहेत.

4) कराटे ः हा जपानचा पारंपरिक मार्शल आर्ट्सचा प्रकार असून या खेळाचेही ऑलिम्पिकमध्ये पदार्पण होत आहे. या खेळाचे ऐतिहासिक महत्त्व व जपानमधील त्याची लोकप्रियता लक्षात घेत आयोजन समितीने या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला आहे. मात्र पुढील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा क्रीडाप्रकार सामील करण्यात आलेला नाही. काटा व कुमिटे अशा दोन प्रकारात यातील स्पर्धा घेतली जाणार असून काटा प्रकारात स्पर्धकांना आपले तांत्रिक कौशल्य दाखवावे लागते तर कुमिटे विविध वजन गटात होणार आहे. स्पर्धकांच्या लढतीतून त्याचे निकाल लावले जाणार आहेत. पुरुष व महिलांसाठी तीन वजन गटात होणारी ही स्पर्धा निप्पॉन बुडोकॉन येथे होणार आहे. सँड्रा सांचेझ (स्पेन), रायो कियुना, कियू शिमिझू (दोघे जपान), हमिदेह अब्बासअली (इराण), त्झू युन वेन (तैपेई) हे या प्रकारातील काही नामांकित कराटेपटू आहेत.
5) बेसबॉल -सॉफ्टबॉल ः 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये बेसबॉलचा प्रथम समावेश करण्यात आला आणि 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर हा क्रीडाप्रकार वगळण्यात आला होता. पण जपानमधील त्याची लोकप्रियता विचारात घेऊन ऑलिम्पिकमध्ये त्याचे पुनरागमन होत आहे. सॉफ्टबॉल हा प्रकार 1996 ऍटलांटा ऑलिम्पिकमध्ये प्रथम सामील करण्यात आला होता. हा प्रकारही 2008 च्या स्पर्धेनंतर वगळण्यात आला होता. टोकियोमध्ये त्याचे पुनरागमन होत असून पुढील पॅरिस स्पर्धेतून वगळण्यात आला आहे. दोन्ही प्रकारांतील पदकांसाठी ऑस्ट्रेलिया, जपान, इटली, अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या संघांतच स्पर्धा होणार आहे. याशिवाय बास्केटबॉल व सायकलिंग हे याआधीच सामील असलेले जुने क्रीडा प्रकार नव्या स्वरूपात यावेळी होताना दिसतील.