पुलाची शिरोली / वार्ताहर
आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत हॉटेल व बार सुरू ठेवल्याबद्दल टोप येथील हॉटेल गौरी व हॉटेल आमंत्रण या दोन हॉटेल व्यवसायांवर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७० साथीचे रोग अधिनियम कलम २, ३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार ही कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी दिली. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यवसायांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी हॉटेल व्यावसाईकांना आपत्ती व्यवस्थापन नियमावली व मुंबई पोलिस आपत्तीकालीन कायदा लागू केला आहे. यामध्ये राञी दहा वाजेपर्यंत हॉटेल आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पण पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील टोप हद्दीतील हॉटेल गौरी व आमंत्रण राञी उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे या दोन्ही हॉटेल व्यावसाईकांवर कारवाई करण्यात आली आहे.
शिरोली औद्योगिक वसाहत परिसरात काही राजकीय प्रभावशाली लोकप्रतिनिधींचेही हॉटेल व्यवसाय रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. काही हॉटेलना अद्याप बार ची परवानगीच नाही. तरीही उशिरापर्यंत काॅकटेल पार्टी सुरू असतात. त्याच्यावरही कारवाई झाली तर पोलिसांचा दुजाभाव जाणवणार नाही.