पेडणे ट्रक मालक संघटनेची उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांशी चर्चा निष्फळ, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / पेडणे

पेडणे येथील ट्रक मालक संघटनेने गुरुवारी दुसऱया दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसून रस्त्याच्या बाजूला पार्क केलेले ट्रकही हटवणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याशी पदाधिकाऱयांनी चर्चा केली मात्र ती निष्फळ ठरल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
बुधवार(दि. 7) पासून पेडणे ट्रक मालक संघटनेने आपले ट्रक महामार्गाच्या कडेला उभे ठेवून आंदोलन सुरू केले होते. सरकारने आमच्या ट्रकांना व्यवसाय देऊन दर वाढवून द्यावा. या प्रकरणात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी गांभीर्याने लक्ष घालून आमच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, अशी संघटनेने मागणी केली. गुरुवारी दुपारी उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकार्त्यांशी चर्चा केली. ट्रक व्यावसायिकाच्या मागणीबाबत मोपा प्रकल्पातील ट्रान्स्पोर्ट कंपनेशी चर्चा केली, ते अधिकारी दर वाढवून देण्यास तयार नाहीत आपण त्यांना जबरदस्ती करू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
मोपा विमानतळ प्रकल्पात जी खडी, रेती आणि चिरे लागतात, त्याच्या वाहतुकीसाठी आम्हाला वाढीव दर देऊन आमच्या ट्रकांना काम द्यावे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार, असा इशारा पोरस्कडे पेडणे येथे ट्रक मालक व्यावसायिक संघटनेने गुरुवारी दिला.
पोलीस फौजफाटा तैनात
गुरुवारी पहिल्या दिवशी वाहतूक खात्याचे अधिकारी किंवा पोलीससुद्धा आंदोलन स्थळी फिरकले नाही. मात्र आंदोलनकार्त्यांसोबत गुरुवारी दुसऱया दिवशी स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करायला येणार याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला.
कंत्राटदाराला स्थानिकांचा दर परवडत नाही : आजगावकर
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर घटनास्थळी गुरुवारी दुपारी आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वी ट्रक व्यावसायिक व कंपनीचा ट्रान्स्पोर्ट कंत्राटदारांशी चर्चा केली आहे. त्यांना स्थनिक ट्रकमालकांचा दर परवडत नाही. कंपनीला दुसरीकडून वाहतूक करणारे ट्रक स्वस्त दर देतात ते परवडतात. कंत्राटदार कंपनी बाहेरच्या गाडय़ा मागवते. स्थनिकांना कंपनीचा दर मान्य असेल तर हा प्रश्न सुटू शकतो, असे उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले. कंपनी स्थानिक ट्रक व्यावसायिकांच्या मागण्या मान्य करत नाही. आपण कंपनीवर जबरदस्ती करू शकत नाही, मात्र आपला पेडणे ट्रक व्यावासायिकांना पूर्ण पाठिंबा आहे. आपण त्यांच्यासोबत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी केला. यावर तोडग्याबाबत विचारले असता आपण ट्रक मालक संघटनेचा नेता नाही, त्यांचे जे नेते आहेत ते तोडगा काढतील, अशी प्रतिक्रिया आजगावकर यांनी दिली.
यावर आंदोलनकर्ते संतप्त झाले व बाबू आजगावकर यांनी आमच्यासोबत राहावे, अशी मागणी केली. काही आंदोलनकर्त्यांनी बाबू आजगावकर यांना तुम्ही आमच्यासोबत नाही, असे सांगताच बाबू आजगावकर संतापले तुमचे नेते वेगळे असल्याचे सांगितले. कंपनी देईल तो दर मान्य करणार नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन हे असेच सुरू ठेवणार, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. दरम्यान, मिशन फॉर लोकलचे पदाधिकारी राजन कोरगावकर, मगोचे जीत आरोलकर, मगो नेते प्रवीण आर्लेकर आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिबा दिला.
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न : ऍड. गावकर
पेडणेत जे वादाचे प्रकार घडतात त्याचे मूळ कारण हे मोपा विमानतळ आहे. पेडणेवासीय न्याय मागताहेत; मात्र स्थानिक आमदार सरकारमध्ये असूनही आमच्या मागण्यांकडे ते दुर्लक्ष करत आहेच. संविधानात आम्हाला न्याय हक्क मागण्याचा अधिकार दिला आहे. आंदोलन करण्यासाठी संविधानात अधिकार आहे. असे असताना पोलीस यंत्रणेला हाताशी धरून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे. या आंदोलनकर्त्यांना आवश्यकती कायदेशीर मदत आपण देणार असल्याचे ऍड. जितेंद्र गावकर यांनी सांगितले. यावेळी मगोचे प्रवीण आर्लेकर, राजन कोरगावकर यांनी बाबू आजगावकर यांच्या भूमिकेचा यावेळी निषेध केला.