केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत, आयटी नियमांबाबत अंतिम नोटीस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार आणि मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर यांच्यात सुरू असलेला वाद काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता नवे डिजिटल नियम तातडीने लागू करा, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा निर्वाणीचा इशारा केंद्र सरकारने ट्विटरला आहे. दरम्यान, शनिवारी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि सरसंघचालक मोहन भागवत यासारख्या चर्चेतील चेहऱयांच्या पर्सनल अकाउंटवरून ब्लू टिक (व्हेरिफाईड) हटविल्यामुळे सोशल माध्यमांवर दिवसभर ‘टिवटिवाट’ सुरू होता. याप्रकरणी झालेल्या टीकेमुळे आयटी नियमांचा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.
नवीन आयटी नियमांबद्दल केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वादावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरविरोधात कठोरपणा दाखवत सरकारने आयटीच्या नव्या नियमांचे पालन करण्याचा अंतिम इशारा ट्विटरला दिला आहे. ट्विटर इंडियाला नवीन नियमांचे त्वरित पालन करण्याची अंतिम सूचना देण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे समूह व्यवस्थापक राकेश माहेश्वरी यांच्याद्वारे आता ट्विटरला पुन्हा पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात ट्विटरने नवे डिजिटल नियम लागू करावे अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशी ताकीदच देण्यात आली आली आहे.
केंद्र सरकारने हा इशारा देण्यापूर्वी ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह आणखी तीन मोठय़ा नेत्यांचे अकाऊंट अनव्हेरिफाईड केले होते. त्याचबरोबर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरुनही ब्लू टिक हटवली होती. दरम्यान, काही तासांतच नायडू यांच्या ट्विटरची ब्लू टिक पूर्ववत करण्यात आली.
नव्या नियमावलीकडे ट्विटरचा कानाडोळा
नवे डिजिटल नियम लागू करण्याबाबत ट्विटरने आतापर्यंत कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. तसेच पाठपुरावाही केलेला दिसत नाही. 26 मे 2021 आणि 28 मे 2021 ला मंत्रालयाने नव्या डिजिटल नियमांबाबत लिहिलेल्या पत्रानंतर ट्विटरने आजपर्यंत कम्प्लायन्स ऑफिसर, तक्रार निवारण अधिकारी आणि नोडल ऑफिसर यांचे कोणतेच विवरण सादर केलेले नाही. ट्विटरच्या कार्यालयाचा पत्ताही एका लॉ फर्मचा असून ते नियमास अनुसरुन नसल्याचे दिसून येत आहे
एकंदर, सध्या भारतामध्ये ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगला आहे. या सामन्याचा शेवट काय होतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वीदेखील गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सऍपने नव्या आयटी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने वैधानिक अधिकारी नियुक्त करण्यास सहमती दर्शवली होती. परंतु ट्विटरने नियमांचे पालन करण्यास असमर्थता दर्शवल्याचे दिसून येत आहे.
उपराष्ट्रपतींचे अकाऊंट पुन्हा व्हेरिफाईड…
‘ब्लू टिक’ हटविण्यासंबंधी आपली चूक मान्य करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे अकाऊंट ट्विटरने पुन्हा व्हेरिफाईड केले आहे. भारत सरकारकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने आपला निर्णय काही वेळेतच बदलला. उपराष्ट्रपती पद हे भारतातील दुसऱया क्रमांकाचे पद आहे. घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती कोणत्याही पक्षाचा भाग नसते. त्यामुळे ट्विटरच्या उपराष्ट्रपतींच्या अकाऊंटचे अनव्हेरिफाईड करणे म्हणजे घटनेचा अनादर असल्याचा संदेश ट्विटरपर्यंत पोहोचवण्यात आला होता. भारत सरकारच्या या कठोर नाराजीनंतर ट्विटरने आपली चूक कबूल करत त्यांचे वैयक्तिक अकाऊंट पुन्हा व्हेरिफाईड केले.
ब्लू टिक हटविल्यामुळे दिवसभर ‘टिवटिवाट’
ट्विटरने उपराष्ट्रपती, सरसंघचालकांसह अन्य बडय़ा युजर्सचे अकाऊंट अनव्हेरिफाईड केल्यानंतर त्यावर अनेकांनी टीका केली होती. उपराष्ट्रपतींचे अकाऊंट अनव्हेरिफाईड करणे हा प्रकार भारतीय संविधानाबद्दल अनादर असल्याचे वक्तव्य भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी केले. तसेच विश्व हिंदू परिषदेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना ट्विटरची तुलना थेट ईस्ट इंडिया कंपनीशी केली. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी ट्विटरची धोरणे ही व्यक्तीच्या विचारसरणीनुसार वेगवेगळी आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. इथूनच पैसा कमवायचा आणि इथल्याच लोकांवर बंदी आणण्याचे प्रकार अयोग्य असल्याचेही ते पुढे म्हणाले.
नायजेरियातून ट्विटर ‘आऊट’…
नायजेरियामध्ये ट्विटरला जोरदार झटका बसला आहे. नायजेरियन सरकारने ट्विटरला देशातून निलंबित केले आहे. ट्विटरने नायजेरियन राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांचे अकाऊंट नुकतेच बंद केले होते. या घटनेनंतर सरकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईबाबत स्पष्टोक्ती देताना ट्विटरने देशात दुटप्पी वर्तन केल्याचा आरोप नायजेरियन सरकारने केला आहे. कॉर्पोरेट अस्तित्वाला धक्का पोहोचविण्यासाठी तसेच त्यासाठी काही कृतींमध्ये सहभागी असलेल्या लोकांना समर्थनार्थ वर्तन केल्याचा ठपका ठेवत नायजेरियाने ही कारवाई केली आहे. नायजेरियाने अनिश्चित काळासाठी ट्विटरवर निलंबनाची कारवाई केली.