- अमृता फडणवीसांना शिवसेना महिला विकास आघाडीचे प्रत्युत्तर
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात यावीत याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्योरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्ये पत्र वॉर सुरू आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारे पत्र लिहिले. यावर माझ्या हिंदुत्वाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिवसेना महिला आघाडी अमृता फडणवीसांवर आक्रमक झाली असून, महिला विकास आघाडीने अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
ट्विटरवर नको, समोर येऊन बोला असे थेट आवाहन शिवसनेच्या महिला आघाडीने अमृता फडणवीसांना दिला आहे. ‘ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली.’ असा एकेरी उल्लेख करत विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला.
पुढे त्या म्हणाल्या, ‘शिवसेनेची राजकारणाची ही चौथी पिढी आहे. आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडले तर तोंड लपवायला जागा राहणार नाही. असा सणसणीत टोला विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीसांना लागवला.