लंडन / वृत्तसंस्था
ट्विटरची धुरा सांभाळणाऱया अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी सीईओपदाची धुरा दुसऱया व्यक्तीकडे सोपविण्याची तयारी दर्शवली आहे. नुकतीच ट्विटरच्या संदर्भात त्यांनी एक नवी आणि मोठी घोषणा केली. आपण लवकरच ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सीईओ म्हणून अन्य कोणीतरी पदभार स्वीकारताच आपण राजीनामा देऊन केवळ कंपनीतील सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमवर लक्ष देणार असल्याचे सांगितले.
नुकत्याच झालेल्या ट्विटर पोलनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा द्यायचा का, असा प्रश्न त्यांनी ट्विटर पोलद्वारे केला होता. या मतदानात 57.5 टक्के लोकांनी मस्क यांच्या राजीनाम्याच्या बाजूने मतदान केले आहे. राजीनाम्याची घोषणा करण्यासोबतच इलॉन मस्क यांनी आपल्या भविष्यातील योजनांचाही खुलासा केला आहे.