राज्यातील मविआ सरकारमधील शिवसेनेत जे बंड झाले आहे त्यामुळे गेले आठ दिवस महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे. सत्तारुढ शिवसेनेतील 39 आमदार व अपक्ष वगैरे विधानसभा-परिषद सदस्य अशा सुमारे 50 जणांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा. अशी भूमिका घेत बंडाचे निशाण हाती घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यासोबत आघाडी नको, निधी वाटपापासून सर्व गोष्टीत अन्याय व खच्चीकरण होत आहे. शिवसेना स्व. बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व यांच्यापासून दूर जाते आहे. मविआ म्हणजे शिवसेना संपवायचा कार्यक्रम आहे, असे सांगत गुवाहाटीला डेरा जमवला आहे. या बंडखोरांची उद्धव ठाकरे, शिवसेना संघटना याबद्दल तक्रार नाही पण मविआ आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत त्यांची भाषा, विचार याबद्दल संताप आहे. हे असेच चालू राहिले तर पुन्हा आपण विजयी होऊ का? याची या पन्नास जणांना खात्री नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या मतदानानंतर या मंडळींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरत गाठली व तेथून हल्लाबोल करत गुवाहाटीला डेरा टाकला व आमचीच खरी शिवसेना हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा व दिघे साहेबांचा विचार पुढे नेणारी आम्हीच असे म्हणत बंडाचे निशाण त्यांनी उंचावले आहे. हे 39 आमदार मविआ सोबत नाहीत यांचा स्पष्ट अर्थ ठाकरे सरकार अल्पमतात आहे. पण सरकार वाचवायला ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत आणि दोन्ही चारी बाजूंनी कायदेशीर व संसदीय नियमाचा किस काढला जातो आहे. शिवसेना एका बाजूला या 39 जणांची प्रेते महाराष्ट्रात येतील असे म्हणत आहेत तर मुख्यमंत्री ठाकरे समोर या अजून वेळ गेलेली नाही चर्चेने मार्ग काढू असे सांगत आहेत. या आमदारांपैकी 15-20 आमदार आमच्या संपर्कात आहेत असाही दावा ठाकरेंकडून केला जातो आहे. एकीकडे या बंडखोरांना चुचकारले जाते आहे. भावनिक साद घातली जाते आहे. तर दुसरीकडे या बंडखोर आमदारांची घरे, कार्यालये यावरही हल्ले होत आहेत. याच दरम्यान शिवसेनेने आपल गटनेता बदलून बंडखोर सोळा आमदारावर कारवाईची, त्यांचे सदस्यत्व रद्द करायची मागणी उपसभापतींकडे केली आहे. उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी या आमदारांना नोटीस काढली असून नवीन गटनेत्याला मान्यता दिली आहे. नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास ठरावाचे पत्र देण्यात आले आहे. तो विषय पेंडिंग असताना झिरवाळ यांना गटनेता बदलता येणार नाही व नोटीस काढता येणार नाही असे आक्षेप आहेत. बंडखोरांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेत या मान्यतेला व नोटीसीला स्थगिती मिळवली आहे. गेला आठवडाभर नुसता खेळ सुरु आहे. दरम्यान शाळा मान्यतापासून बदल्या-बढत्या, शासन आदेश आणि निर्णय यासाठी मंत्रालयात वेगाने काम सुरु आहे. ठाकरेंनी वर्षा निवासस्थान सोडले आहे. या साऱयाचा अर्थ स्पष्ट आहे. राज्यावर गेले काही दिवस अल्पमतातील सरकार सत्ता गाजवते आहे व आता या सरकारला अग्नीपरीक्षेला अर्थात सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासाऱया घडामोडीत पडद्यामागे भाजप होती हे छुपे सत्य आहे. पण आम्ही वेट ऍन्ड वॉच भूमिकेत आहोत, असे भाजपा नेते एका सुरात सांगत होते. आता कोरोनातून सावरलेले राज्यपाल कोशारी आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस ऍक्टीव झाले आहेत. सभागृहात बहुमत चाचणी होणार आहे. कोशारी यांनी तसे निर्देश दिले आहेत. ओघानेच महाराष्ट्राला बहुमत असलेला मुख्यमंत्री लाभणार आहे. भाजप आणि शिंदे समर्थक आमदार सोबत अपक्ष व प्रहार सारखे पक्ष यांनी गट्टी जमवली आहे. रात्रीच्या अंधारात बैठका घेऊन सत्तेचे वाटप आणि अग्रक्रमाची कामे निश्चित केली आहेत. पहाटेचा शपथविधी वाया गेला त्यामुळे रात्रीच्या बैठका सावधपणे घेतल्या गेल्या आहेत. आता सभागृहात विशेष अधिवेशनात काय होते हे महत्वाचे पण अजूनही सर्व गोष्टी स्वच्छ झालेल्या नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठाकरे की फडणवीस या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. ज्या शक्यता व्यक्त होत आहेत त्यानुसार हे 39 आमदार भाजपात सहभागी होतील किंवा प्रहार, मनसे असा पक्ष आपलासा करतील. मनसे या भानगडीत पडणार नाही, असे वाटते पण शिंदे व राज ठाकरे समदुःखी आहेत. काहीही होऊ शकते. हे 39 आमदार तिकीटाचे आश्वासन घेऊन भाजपात आले तर भाजपातही अस्वस्थता निर्माण होऊ शकते. भाजपात मूळ कार्यकर्ते संतप्त आहेत. भाजपाची काँग्रेस झाली, असा जुन्यांकडून आरोप होतो आहे. निष्ठावंतांना केवळ वापरले जाते. उपऱयांना सारे दिले जाते असे या पक्षातील चित्र आहे. हे 39 जण पक्षात आले तर हे चित्र अधिक भेसूर होईल असे म्हटले जाते. पण राजकारणात सत्ता महत्वाची. ओघानेच दिल्ली बैठका करुन आलेले फडणवीस धोरण ठरवून आले आहेत हे उघड आहे. विशेष आधिवेशन, उपसभापतींवरचा अविश्वास, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, बंडखोर आमदारांची उपस्थिती, शिवसेनेचा व्हीप, त्या 39 आमदारांची सभागृहातील भूमिका असे अनेक ढग अजून दाटलेले आहेत. सभागृहातील अग्नीदिव्य जेव्हा होईल त्यानंतरच ठाकरे की फडणवीस हे ठरेल. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर हात ठेऊन जनमताचा कौल मिळालेली भाजप-सेना युती फोडली व वैचारिकदृष्टय़ा अनैसर्गिक असा मविआ प्रयोग केला. त्यामुळे त्यांचा खूप बोलबाला झाला. पुढील 25 वर्षे मविआ सरकार असे संजय राऊत म्हणू लागले, शिवसेना प्रवक्ते उद्धव ठाकरेंना पुढील पंतप्रधान व शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे दावेदार म्हणू लागले. अनैसर्गिक आघाडी प्रयोग अडीच वर्षात अडचणीत आला. त्याचे फटके कोणकोणाला बसतात हे बघायचे. तूर्त पंढरीच्या दिशेने वैष्णवांच्या दिंडय़ा, निघाल्या आहेत. आषाढीला मुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करतात. यंदा हा मान कुणाला मिळतो हे एक-दोन दिवसात ठरेल. गुरुपुष्यामृताचा मुहूर्त काढण्यात आला आहे. अग्नीपरीक्षेत कोण उत्तीर्ण होते व ठाकरे की फडणवीस कोण मुख्यमंत्रीपद भूषविते हा सवाल आहे.
Previous Articleसिंधू, कश्यप दुसऱया फेरीत
Next Article जय महाराष्ट्र…!, मविआ सरकार कोसळले
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment