उपनगराध्यक्षपदी तनुजा गावकर बिनविरोध. आज सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची अधिकृत निवड होणार. प्रत्येकी एकच अर्ज दाखल.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी ठरल्याप्रमाणे नगरसेवक कुंदन फळारी यांचा एकच, तर उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका सौ.तनुजा सतीश गावकर यांचा एकच अर्ज अंतीम मुदतीत दाखल झाल्याने या दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड होणार आहे. डिचोली नगरपालिकेच्या नवीन मार्केट प्रकल्पातील सभागृहात आज गुरू. दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी संपन्न होणार असून नंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार आहे.
डिचोली नगरपालिका निवडणुकीचा निकाल बहुमताने भाजप पुरस्कृत डिचोली विकास समितीच्या बाजूने लागल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी खरी चढाओढ पहायला मिळाली. माजी नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी आपला मजबूत दावा पक्षासमोर ठेवला होता. तर माजी उपनगराध्यक्ष कुंदन फळारी यांना नगराध्यक्ष बनविण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या गटाने जोर धरला होता. त्यामुळे या पदाचा दावेदार ठरविण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान होते.
यासाठी गेल्या सोम. दि. 29 मार्च रोजी डिचोलीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासमवेत सर्व नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत कुंदन फळारी यांच्या नावाला नगराध्यक्षपदासाठी जास्त पसंती मिळाल्यानंतर त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. तर नगरसेविका तनुजा गावकर यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र सदर बै??ठकीत नगरसेविका तनुजा गावकर यांनी उपनगराध्यक्ष पद घेण्यास नकार दिला होता. त्यानंतरही त्यांच पावित्रा तोच असल्याने त्यांनी जर उमेदवारी अर्जही भरला नाही तर ऐनवेळी हे पद दुसऱया एखाद्या नगरसेवकाला देण्याची खेळी खेळण्याची पाळी भाजप डिचोली मंडळावर येणार होती.
मात्र तनुजा गावकर यांनी काल बुध. दि. 31 मार्च रोजी सकाळी अर्ज भरण्याच्या मुदतीत आपला उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांना सुचक म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक अनिकेत चणेकर यांनी स्वाक्षरी मारली. तर नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केलेल्या कुंदन फळारी यांना सुचक म्हणून नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी स्वाक्षरी मारली. आज गुरू. दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. बाजारातील नवीन मार्केट प्रकल्पाच्या सभागृहात नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा शपथविधी आणि नंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेला निवडणूक अधिकारी म्हणून फोंडाचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांची उपस्थिती लाभणार आहे.