तेलंगणामधील टँकरचालकाला अटक
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी विभागाने बेकायदा दारू वाहतुकीवर करडी नजर ठेवली आहे. मंगळवारी किणयेजवळ तेलंगणामधील एका टँकरचालकाला अटक करून त्याच्या जवळून 121 बॉक्स गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. डिझेल टँकरमधून बेकायदा दारू वाहतूक करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.
लिंगस्वामी नरसिंह (ता. नरसिंगबबला, जि. नलगोंड-तेलंगणा) असे अबकारी विभागाने अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. एपी 36 पीबी 1069 क्रमांकाच्या डिझेल टँकरमधून बेकायदा दारू वाहतूक करण्यात येत होती. जप्त टँकरची किंमत 6 लाख रुपये होते तर दारूची किंमत 3 लाख 43 हजार इतकी होते.
अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त जयरामेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली रवी मुरगोड व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तपासणी वाढविण्यात आली आहे.