प्रतिनिधी बेळगाव
शाळांचा पत्ता नाही, मात्र परीक्षा मंडळाला परीक्षेची घाई अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएसएलसी परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्याची घाई सुरू आहे. त्यानुसार डिसेंबरच्या तिसऱया आठवडय़ात दहावीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता मंडळाने व्यक्त केली आहे. यामुळे मिशन एसएसएलसीचे चित्र वेळापत्रक जाहीर होताच ठरणार आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे घेणाऱया विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.
2020-21 हे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे सुरू होण्यापूर्वीच थांबले. मात्र, ऑनलाईन शिक्षणप्रणाली शैक्षणिक वर्ष सुरू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरली. परिणामी शाळा नसल्या तरी परीक्षा घेण्याचा विचार माध्यमिक शिक्षण मंडळाने केला असून शालेय जीवनाचा अंतिम टप्पा असणाऱया एसएसएलसीचे चित्र स्पष्ट केले जाणार आहे. त्यानुसार परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात येणार, परीक्षेचे स्वरुप, परीक्षेचे वेळापत्रक याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोरोनाच्या प्रभावात गतवर्षी पहिली ते 9 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, विलंबाने का होईना दहावी व बारावीची परीक्षा झाली होती.
सध्याच्या परिस्थितीचा विचार करून एसएसएलसीच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. प्रामुख्याने 30 टक्के कपात झाली असून अध्यापनाचा वेळ आणि विद्यार्थ्यांची ऑनलाईन वाटचाल विचारात घेऊन अभ्यासक्रमात आणखी कपात करणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह व्यक्त होत आहे. मात्र शिक्षण विभागाने याबाबतचे चित्र सादर केलेले नाही. यामुळे डिसेंबरअखेर शाळा बंदच राहणार असल्या तरी डिसेंबरच्या तिसऱया आठवडय़ात एसएसएलसीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.