पाकिस्तानी एजंट्सला गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप
बालासोर
ओडिशाच्या बालासोर येथे असलेल्या ‘डिफेन्स रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’मध्ये (डीआरडीओ) काम करणाऱया चार कर्मचाऱयांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर संशयित पाकिस्तानी दलालांना संवेदनशील माहिती पुरविल्याचा आरोप आहे. हे सर्व कर्मचारी येथे करारावर कार्यरत होते. आयएसडी कॉलद्वारे ते अन्य कोणाच्यातरी संपर्कात असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱयांकडून देण्यात आली. याप्रकरणी चांदीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीआरडीओमधील गोपनीय माहिती देशाबाहेर पुरविली जात असल्याची बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी चार डीएसपी आणि अनेक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांची टीम तयार करण्यात आली. त्यानंतर करारावर काम करणाऱया या कर्मचाऱयांना चांदीपूरमध्ये छापा टाकून पकडण्यात आले आहे. या सर्वांवर विदेशी एजंटांना गुप्तचर माहिती दिल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी निवेदन जारी केले आहे. या चौघा जणांकडे अनेक महत्त्वाची कागदपत्रेही सापडली आहेत.