ब्लूमबर्गकडून नोकरकपातीची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डेल कंपनीने 6,650 जणांना नोकरीवरुन कमी करणार असल्याचे संकेत असून, त्याच्या कर्मचाऱयांपैकी सुमारे पाच टक्के जणांना काढलं जाणार असल्याची माहिती आहे. पीसीच्या म्हणजे कॉम्प्युटरच्या मागणीतील घट हे त्यासाठी कारण सांगितले जात आहे. सध्याला आर्थिक अनिश्चिततेचा कंपनीला सामना करावा लागतो आहे. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती जाहीर केल्याचे ब्लूमबर्ग यांनी सांगितले आहे.
येत्या काही आठवडय़ांमध्ये, कंपनी भविष्यासाठी काही बदल स्वीकारणार आहे. यामध्ये विविध प्रकारची आर्थिक गुंतागुंत कमी करण्यासाठी व कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि नवीन संकल्पनेला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही माहिती डेलचे सह-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे.
डेलच्या म्हणण्यानुसार प्रभावित झालेल्या कर्मचाऱयांच्या समस्या ऐकण्यात येणार आहेत. तसेच काढलेल्या कर्मचाऱयांना पुढील संधीं उपलब्ध करुन देण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही नमूद केले आहे. डेलच्या टाळेबंदीमुळे या वर्षाच्या सुरुवातीपासून मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि सेल्सफोर्ससह टेक कंपन्यांनी कमी केलेल्या कर्मचाऱयांची संख्या ही 48,000 इतकी झाली आहे.
आगामी काळात खर्चात कपात करण्याची योजना आखली जात आहे. यामुळे कंपनीच्या महसुलात 55 टक्के इतका फरक पडणार असल्याची माहिती आहे.