केएलईतर्फे जागतिक ग्लुकोमा दिनानिमित्त कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
प्रत्येकांनी डोळय़ांची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्लुकोमामुळे दृष्टी जाऊ शकते. आपल्या देशात 12 मिलियन लोक ग्लुकोमामुळे त्रस्त आहेत. ग्लुकोमा पूर्णपणे बरा होत नसला तरी त्याची वाढ रोखता येते. आधीच रोगनिदान झाल्यास आंधळेपणाही टाळता येतो, असे डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी सांगितले.
केएलई विद्यापीठ, डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्र, जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 10 मार्च रोजी जागतिक ग्लुकोमा दिन आचरण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. विकसनशील देशामध्ये डोळय़ांचे आजार असणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील जनतेमध्ये याविषयी जागृती करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नेत्र तपासणी विभागाचे प्रमुख डॉ. शिवानंद बुबनाळे, काहेरचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. एस. बी. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी, डॉ. आरीफ मालदार, डॉ. अरविंद तेणगी, डॉ. स्मिता प्रभू, डॉ. भाग्यज्योती कुरबेट, डॉ. प्रज्ञा पोरवाल, डॉ. चेतना, डॉ. रोहिणी, डॉ. शरवानी, डॉ. फरहीन आदी उपस्थित होते.