चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ात थ्रोटल एअरोस्पेस सिस्टम कंपनीचा पुढाकार
प्रतिनिधी / बेंगळूर
देशात प्रथमच ड्रोनद्वारे औषधांची वाहतूक करण्याचा प्रयोग कर्नाटकात केला जाणार आहे. चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ातील गौरीबिदनूर येथे 18 जूनपासून याची पूर्वतयारी चाचणी आणि 21 जूनपासून 45 दिवस प्रायोगिक चाचणी केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अमेरिका, चीनप्रमाणे भारतातही ड्रोनद्वारे औषधांची वाहतूक सुरू होईल.
बेंगळूरमधील ड्रोननिर्मिती कंपनी थ्रोटल एअरोस्पेस सिस्टम (टीएएस) व इतर संस्थांच्या साहाय्याने डॉ. देवी शेट्टी यांच्या नारायण हेल्थ केअरसाठी औषधे वाहून नेण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. नारायण हेल्थ संस्था आवश्यकता असणारी औषधे टीएएस कंपनीला देणार आहे. रुग्णांना आवश्यक असणाऱया औषधांची माहिती टीएएसच्या सॉफ्टवेअरला पाठवून दिली जाईल. ती पडताळून औषधे बॉक्समध्ये पॅक केली जातील. त्यानंतर रुग्णाने पाठविलेल्या लोकेशनवर 4 जी तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन नियोजित ठिकाणी पोहोचेल. ड्रोन उडत असताना झाडे, उंच इमारती हे अडथळे पार करू शकते. मेडकॉप्टर मॉडेलचे लहान ड्रोन 1 किलोपर्यंतचे वजन 15 कि. मी. पर्यंत पल्ला गाठू शकते. तर प्लस कॉप्टर हे आणखी एक मॉडेलचे ड्रोन 2 किलो वजनाची औषधे 12 कि. मी. पर्यंत वाहतूक करू शकते, अशी माहिती टीएएसचे प्रोडक्ट टेक्निकल इंजिनियर रिषभ यांनी दिली आहे.