पूर्ण जग कोविड-19च्या महामारीला तोंड देत आहे. कोविड-19 चा संसर्ग नष्ट करणारी कुठलीच लस उपलब्ध नाही तसेच प्रभावी औषधही विकसित करण्यात आलेले नाही. 17 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाखापेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या विरोधात भारतही युद्ध लढत असून या संकटावेळी भारतीयांनाही नवोन्मेषी साधनांची निर्मिती केली आहे.
टेस्टिंग किट, रोबोट्सची निर्मिती

भारताने कोरोनाविरोधी लढय़ात नवोन्मेषाची मदत घेतली आहे. लो-कॉस्ट पोर्टेबल व्हेंटिलेटर्स तयार करण्यासह ड्रोन्सद्वारे सॅनिटायझेशन आणि देखरेख केली जात आहे. औषधे आणि अन्न पोहोचविण्यासाठी रोबोट्सचा वापर होत आहे. काही अंतरावरून रुग्णांना तपासण्यासाठी विशेष स्टेथेस्कोपही तयार करण्यात आला आहे. पोर्टेबल सॅनिटायजरही विकसित करण्यात आला आहे. रुग्णालयांमध्ये वापरासाठी विशेष इन्फेक्शन प्रूफ कपडे, लॉ-कॉस्ट व्हायरस टेस्टिंग किट्स, आयसोलेशन पॉड्स, बबल हेल्मेट्स यासारखी साधने या संकटकाळात निर्माण करण्यात आली आहेत.
सामग्री करा सॅनिटाइज

आयआयटी गुवाहाटीने दोन रोबोट्स तयार केले असून ते आयसोलेशन वॉर्डमध्ये तैनात केले जाऊ शकतात. आयआयटीने अल्ट्राव्हायोलेट जर्मीसिडल इररेडिएशन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱया उपकरणाची निर्मिती केली आहे. हे उपकरण दरवाजानजीक ठेवल्यास बाहेरून येणारे सर्व साहित्य म्हणजेच धान्य, नोटा, बॉटल्स 30 मिनिटात सॅनिटाइज करता येणार आहेत.
देखरेखीसाठी विशेष ऍप

आयआयटी आणि आयआयएससीने मिळून एक ऍप तयार केला आहे. या ऍपद्वारे संबंधित व्यक्तीने क्वारेंटाईनचा भंग केला आहे की नाही, हे समजते. तसेच गोकोरोनागो आणि संपर्क-ओ-मीटर यासारखे ऍप्स कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोविड-19 बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याच्या जोखिमीची गणना करतात.
दूरवरून ओळखणार नाडी

आयआयटी मुंबईने ‘डिजिटल स्टेथेस्कोप’ निर्माण केला आहे. हा स्टेथेस्कोप काही अंतरावरूनच रुग्णाच्या हृदयाची कंपने नोंदविणार आहे. म्हणजेच डॉक्टरला रुग्णानजीक जाण्याची गरज भासणार नाही. उपकरणामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होणार आहे.
विशेष आयसोलेशन पॉड

श्री चित्रा तिरुनाल आयुर्विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने आयसोलेशन पॉड तयार केला आहे. हा पॉड रुग्णाला इतरांच्या संपर्कात येण्यापासून रोखणार आहे. फोनबूथसारख्या दिसणाऱया चेंबरमध्ये कोविड-19 रुग्णाची तपासणी केली जाऊ शकते. यात दिवा, टेबल फॅन, रॅक आणि युव्ही लाइट आहे. रुग्ण पॉडबाहेर पडल्यास युव्ही लाइट चेम्बरचे निर्जंतुकीकरण करते.