नोव्हेंबर 2013 मधील गाजलेले प्रकरण : अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही
प्रतिनिधी / पणजी
तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना संशयाचा फायदा मिळाल्याने 7 वर्षांपूर्वी अत्यंत गाजलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातून म्हापसा येथील खास सत्र न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
कोरोना महामारीमुळे सदर प्रकरणावरील सुनावणी लांबली होती. त्यानंतर बुधवार दि. 19 मे रोजी निवाडा वाचन होणार होते पण चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे न्यायालयासह संपूर्ण शहराची वीज गुल झाली होती. त्यामुळे कामकाज होऊ शकले नव्हते. वरिष्ठ न्यायमूर्ती सौ. क्षमा जोशी यांनी काल शुक्रवारी निवाडा वाचन केले.
नोव्हेंबर 2013 मधील घटना
बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये ‘थिंक फेस्ट’ महोत्सव 8 ते 10 नोव्हेंबर 2013 दरम्यान चालू होता. त्यात मोठमोठय़ा विचारवंतांची व्याख्याने होती. या महोत्सवात तेहलकाचे तत्कालीन संपादक तरुण तेजपाल आपल्या एका कनिष्ठ महिला पत्रकारासोबत होते. दुसऱया बाजूने गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही चालू होता.
लिफ्टमध्ये घडला प्रकार
बांबोळी येथील त्या तारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार घडल्याचा आरोप होता. लिफ्टमध्ये कॅमेरे बसवण्यात आले नव्हते. रात्रीचे जेवण तळमजल्यावर होते. ते उरकल्यानंतर सदर संशयित आरोपी आपल्या महिला सहकाऱयासोबत सातव्या मजल्यावर एका अतिथीला भेटण्यासाठी लिफ्टमधून दोघे गेले. लिफ्ट अवघ्या काही सेकंदातच सातव्या मजल्यावर पोहोचली. या काही सेकंदातच लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
ई-मेल पत्र बाहेर फुटले
तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोभा चौधरी यांना त्या पीडित पत्रकार युवतीने ई-मेलवरुन गोव्यात घडलेला प्रकार सांगितला. आपल्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार घडल्याचे कळविले. सदर ई-मेल तिने आपल्या इतर सहकाऱयांना पाठवले होते. सदर ई-मेल सोशल मीडियावर लिक झाल्यावर ते व्हायरल झाले.
गोवा सरकारने घेतली दखल
व्हायरल झालेल्या ई-मेलची गोवा सरकारने दखल घेतली व सुमोटो तक्रार नोंदवून घेऊन दि. 20 नोव्हेंबर 2012 रोजी तरुण तेजपाल यांना अटक करण्यात आली. त्यावेळी स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते. पीडित युवतीने तक्रार न करता पोलीस दखल घेऊ शकतात का असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मुंबई येथे जाऊन गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी तिची जबानी घेतली होती.
वरिष्ठाने गैरफायदा घेऊन केला लैंगिक अत्याचार
गोवा गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एकूण 2 हजार 684 पानी आरोपपत्र ठेवले होते. त्यात 354 (ए) म्हणजे लैंगिक अत्याचार, 376 (बलात्कार), 376 के2 (बॉसने केलेला बलात्कार), 376 एफ(2) (महिलेने आपल्या वरिष्ठावर विश्वास ठेवला त्याचा गैरफायदा घेऊन त्या वरिष्ठाने बलात्कार केला) तसेच 341 (जबरदस्तीने अडवणूक), 342 (जबरदस्तीने ताब्यात ठेवणे) ही कलमे लावण्यात आली होती.
प्रकरण पोहोचले सर्वोच्च न्यायालयात
मार्च 2004 मध्ये संशयित आरोपी तरुण तेजपाल याने सर्वोच्च न्यायालयात धांव घेतली आणि जामीन मागितला. जून 2014 मध्ये त्याला जामीन मिळाला. त्यानंतर सदर खटला बंद करुन आपल्याला निर्दोष मुक्त करावे अशी याचना करुन त्याने नोव्हेंबर 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धांव घेतली पण खंडपीठाने याचिका फेटाळताच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देताना जलद गती न्यायालयाने 6 महिन्याच्या आत सुनावणी संपवावी व निवाडा द्यावा असा आदेश दिला होता. अनेक कारणांनी सुनावणी लांबली. शेवटी काल शुक्रवारी निवाडा जाहीर झाला.
अवघ्या सेकंदांत हा अत्त्याचार शक्य आहे काय?
तळमजल्यावरुन सातव्या मजल्यावर अवघ्या काही सेकंदातच लिफ्ट पोहोचली. या काही सेकंदात लैंगिक अत्याचाराचे जे वर्णन पीडित युवतीने केले आहे ते शक्य आहे का? असा प्रश्न संशयित आरोपीचे वकील राजीव गोम्स यांनी उपस्थित केला होता.
… तर तिने आरडाओरड का केली नाही?
ज रलिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार झाला तर तिने बाहेर आल्यावर आरडा ओरडा का केला नाही? ती मुकाटय़ाने संशयित आरोपी सोबत का चालत राहिली? असा प्रश्न वकिलांनी उपस्थित केला होता.
लिफ्ट मध्येच थांबविण्याची सोय होती बंद
लिफ्ट मधेच थांबवून संधी घेतली असा आरोप झाला, तेव्हा त्या लिफ्टला मधेच थांबवण्याची सोय बंद करण्यात आल्याचे आढळले. जेव्हा कथित लैंगिक अत्याचार झाला तेव्हा लिफ्ट मधेच थांबवण्याची सोय होती याचा पुरावा पोलीस न्यायालयासमोर सादर करु शकले नाहीत.
वचपा काढण्यासाठी खोटा आरोप?
सदर पीडित युवतीला सदर संशयित आरोपी असलेल्या तरुण तेजपाल याने संपादक या नात्याने यापूर्वी मेमो दिला होता. तिच्या कामावर शंका घेऊन ते योग्य नसल्याची टिपणी केली होती. त्यामुळे खोटा आरोप करुन तिने वचपा काढल्याचा युक्तिवाद वकिलांनी मांडला होता.
राजकीय षडयंत्र
तरुण तेजपाल यांनी अनेकवेळा भाजप सरकारवर शरसंधान केले होते. त्यासाठी सदर षडयंत्र मनोहर पर्रीकर सरकारने रचल्याचा आरोप त्यावेळी झाला होता.
कारण माहीत नाही : सरकारी अभियोक्ता
तरुण तेजपाल यांना निर्दोष ठरवण्यात आले. या निवाडय़ाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल. फक्त एका वाक्यात निवाडा वाचन संपले. निर्दोष का ठरवले याची कारणे निवाडा वाचल्यानंतर समजणार असल्याचे खास सरकारी अभियोक्ता फ्रान्सिस तावारीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनिता सावंत हजर होत्या.
ऍड. राजीव गोम्स यांचे आजन्म ऋणी
तरुण तेजपाल यांची यशस्वी बाजू मांडणारे तरुण वकील राजीव गोम्स हे कोरोनामुळे नुकतेच म्हणजे रविवार 16 मे रोजी दिवंगत झाले आहेत. त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा आपण आजन्म ऋणी असल्याची प्रतिक्रिया तरुण तेजपाल यांनी न्यायालयाबाहेर आल्यानंतर दिली. सत्याच्या बाजूने राहिल्याने त्यांनी न्यायमूर्तीचे आभार मानले. निवाडा वाचन ऐकल्यानंतर म्हापसा येथून ते थेट मडगांव येथील दफन भूमित जाऊन ऍड. गोम्स यांच्या समाधीवर फुले वाहिली.
तेजपालच्या मुलीने वाचले प्रसिद्धी पत्रक
न्यायालयाबाहेर येताच तरुण तेजपाल यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. योग्य वेळ आल्यावर आपण भाष्य करणार असे ते म्हणाले. त्यानंतर तेजपाल यांच्या मुलीने पत्रकारांसमोर प्रसिद्धीपत्रक वाचून दाखवले.