पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : गोव्याच्या विकासाची केली प्रशंसा,गोवा हीरक महोत्सवाचा शानदार समारोप

प्रतिनिधी /पणजी
पोर्तुगीज राजवटीत गोवा अनेक भयानक संकटांना सामोरा गेला आहे. मात्र आपले गोमंतकीय अस्तित्व विसरला नाही. भारत स्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगिजांकडे राहिला होता. मात्र गोवा भारत देशाचा अविभाज्य भाग आहे हे भारत कधी विसरला नाही. साडेचार वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीच्या काळातही गोव्याची नाळ भारताकडेच जुळलेली होती. सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ राहिले असते तर गोवा बऱयाच अगोदर मुक्त झाला असता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील जाहीरसभेत केले.
गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून जगात प्रसिद्ध आहेच, त्याच बरोबर शांतीप्रिय प्रदेश म्हणूनही गोव्याची ख्याती आहे. गोव्यात विविध धर्माचे लोक राहत असले तरी त्याच्यांत मतभेद नाहीत. येथील लोक मानवतेचे पुजारी आहेत, असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी यावेळी काढले.
गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्ष समारोप सोहळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व बाबू आजगावकर, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, गोवा विधानसभा सभापती राजेश पाटणेकर, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मंत्रीगण पाऊसकर, फिलीप नेरी, मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात, नीलेश काब्राल व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोव्याच्या विकासाची गती वाढतीच
गोव्याच्या विकासाची गती वाढतच आहे. ही गती अशीच वाढत राहिल्यास गोवा मुक्तीचे अमृत महोत्सवी वर्षात गोवा हे विकासाची उचीं गाठणारे पहिल्या नंबरचे राज्य ठरणार असेही पंतप्रधान म्हणाले. गोव्याचे प्रशासन, दरडोही उत्पन्न व अन्य सगळ्याच गोष्टी देशात पहिल्या नंबरवर आहेत. कोविड लसीकरणाचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करणारे गोवा हे पहिले राज्य असल्याने आपण गोवा सरकार आणि येथील जनतेचे खास अभिनंदन करीत असल्याचेही मोदी म्हणाले.
पाच स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान
या कार्यक्रमात गोवा मुक्तिलढय़ात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक गोविंद चिमुलकर, शारदा सावईकर, रोहिदास नाईक, गुरुदास कुंदे व जगन्नाथ शिरोडकर यांचा पंतप्रधानांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यातील पाच प्रकल्पांचे लोकार्पण
राज्यातील पाच प्रकल्पांचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. त्यात आग्वाद तुरुंगांचे सुशोभीकरण, गोमेकॉतील सुपर स्पेशलिटी विभाग, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ, हवाई कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे.
यावेळी दोन टपाल तिकिट व मेघदुत या पोस्ट कार्डचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाल, नंदादीप प्रदान केला. तसेच मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. स्वागतपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील विकासकामांचा तसेच राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षात केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.
अनेक पंचायती प्रशस्तीपत्राने सन्मानित
यावेळी राज्यातील उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पंचायत, बिगर सरकारी संस्था, तसेच स्वयंपूर्ण मित्र यांना पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. पंचायतीमध्ये खोतीगाव पंचायत काणकोण, किर्लपाल दाभाळ पंचायत धारबांदोडा, उगे पंचायत सांगे, खेतोडे पंचायत सत्तरी, सुर्ल पंचायत डिचोली, कावरे पिर्ला पंचायत यांचा सहभाग आहे.
पालिका, एनजीओ, स्वयंपूर्ण मित्रांचा सन्मान
डिचोली नगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. बिगर सरकारी संस्था जीएलएफचा सन्मान आशा वेर्णेकर यांनी स्विकारला तर डीआरडीएचा सन्मान दीपक सोनावणे यांनी स्विकारला. स्वयंपूर्ण मित्र म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्यांमध्ये विनायक वळवईकर, अमर हेवळेकर, इशा सावंत, अरुण पंचवाडकर, दीपक पेडणेकर, प्रसिध्द नाईक यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी 2 वाजता पणजी येथील आझाद मैदानावर जाऊन तेथील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहिली. पोर्तुगिजांच्या विरोधात लढा देताना मुक्तीसंग्रामात हुतात्मा झालेल्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या सोबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेनिमित्ताने आझाद मैदान परिसारतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती तसेच परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या भागाला एक प्रकारे छावणीचे स्वरूप आले होते. त्यानंतर ते आपल्या बुलेटप्रुफ वाहनातून थेट मिरामारवर गेले. तेथे हवाईदल व नौदलाने यांनी संयुक्तरित्य पंतप्रधान मोदी यांना मानवंदना दिली. तसेच नौदल व वायुदलाने विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या. मोदी सोबत या कवायतींचा आनंद लुटण्यासाठी मोठय़ा संखेने लोक उपस्थित होते.
क्षणचित्रे
- विविध खात्याचे संचालक तसेच आमदारांची सभागृहात उपस्थिती
- सभागृहात हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती
- काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची उपस्थिती लक्षवेधी होती.
- ढोलताशे आणि घोषणांनी अवघे सभागृह दणाणून गेले
- बारा पंचयात, दोन नगरपालिका व दान एनजीओचा गौरव
- दोन तपाल तिकीट व मेघदुत पोस्ट कार्डचेही झाले अनावरण
पंतप्रधानांकडून मनोहर पर्रीकरांचे स्मरण
माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आवर्जून स्मरण केले. ते म्हणाले की गोव्याची प्रगती पाहतो तेव्हा पर्रीकर यांची आठवण होते. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते राज्यासाठी वावरले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. पर्रीकर यांच्या काळात गोव्याच्या विकासाची गती सुरु झाली ती तशीच पुढे नेल्यास गोवा अमृत महोत्सवी वर्षात समृद्ध गोवा बनेल, असेही ते म्हणाले.