काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान – मोदीना अटक करणार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना अटक करू आणि त्यांना फासावर लटकवू असे वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे वरिष्ट नेते आणि माजी आमदार अब्दुल राशिद डार यांनी केले आहे. उत्तर काश्मीरच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही टिप्पणी केली आहे.
कलम 370 आमच्यासाठी एक मोठी शक्ती होती. पण भारताने ही शक्ती काढून घेतली आहे. दैनंदिन वापराच्या गोष्टींच्या किमती देखील वाढल्या आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यास प्रथम मोदींना अटक करू आणि त्यानंतर त्यांना फासावर लटकवू असे राशिद म्हणाले.
कलम 370 पुन्हा आणू
या कार्यक्रमात जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रमुख गुलाम अहमद मीर देखील उपस्थित होते. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाल्यास आम्ही 5 ऑगस्ट 2019 चा निर्णय पलटविणार आहोत. काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या लोकांकडून कधीच काही हिसकावून घेतले नाही, उलट सत्तेवर असताना पक्षाने आम्हाला विशेषाधिकार दिले. कलम 370 च्या बाजूने असलेल्या काँग्रेसच्या भूमिकेचा भाजपने लाभ उचलला. यामुळे आमच्या पक्षाला मोठा फटका बसला. तरीही आमच्या पक्षाने या भूमिकेवरून घुमजाव केले नसल्याचा दावा मीर यांनी केला आहे.
भाजप नोंदविणार गुन्हा पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल राशिद डार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. काँग्रेसला देशभरात नाकारण्यात येत आहे. काँग्रेस पक्षात केवळ राशिद डार सारखेचे लोक असू शकतात. दिवसा स्वप्न पाहणारेच पंतप्रधान मोदींना फासावर लटकविण्याबद्दल बोलू शकतात असे भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले आहे.