हेब्बाळ जवळील प्रकार : तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांना सादर केले निवेदन ; मार्ग काढण्याचे आश्वासन

प्रतिनिधी /खानापूर
खानापूर नंदगड रस्त्यावरील हेब्बाळ गावाजवळ असलेल्या लहान तलावाचे पाणी परिसरातील शेतीवाडीत घुसून सुमारे 50 एकर शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ही नुकसानीची मालिका गेली दोन वर्षे सुरू आहे. या संदर्भात यापूर्वी निवेदने देऊनही ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही. यामुळे तलाव पूर्ण भरल्यानंतर वाहून जाणाऱया ज्यादा पाण्याचा योग्य निचरा करुन आमचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी करणारे निवेदन हेब्बाळमधील शेतकरी युवकांनी सोमवारी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी प्रकाश हालप्पण्णावर यांना सादर केले. शेतकऱयांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी केले होते.
हेब्बाळ गावाजवळ मेजर एरिगेशनच्या मोठय़ा तलावाबरोबरच एक लहान तलावही आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीवाडीसाठी तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठीही होतो. पण गेली दोन-तीन वर्षे पडणाऱया मुसळधार पावसामुळे तो तलाव तुडुंब भरुन त्याचे पाणी बाहेर पडत आहे. बाहेर पडणारे पाणी शेतीवाडीत जाऊन कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी ते पाणी योग्य प्रकारे जाण्यासाठी कालवाही काढला आहे. पण या कालव्याजवळ ग्रामपंचायतीने रोजगार हामी योजनेतून शेतीवाडीला जाण्यासाठी पुल बांधला आहे. त्यामधून पाणी जाण्यासाठी पाईप घालण्यात आले. तो पूल योग्य प्रकारे न बांधल्याने तलावात तुडुंब भरल्यानंतर साचणारे ज्यादा पाणी त्या कालव्याचा मार्ग बंद झाल्याने शेतीवाडीत घुसून गेली दोन वर्षे 50 एकर शेतीचे नुकसान होत
आहे.
यामुळे ज्यादा पाणी जाण्यासाठी काढलेला मार्ग योग्य प्रकारे मोकळा करुन ते पाणी शेतीवाडीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार
आहे.
या संदर्भात ता. प. कार्यकारी अधिकारी प्रकाश हलप्पण्णावर यांनी निवेदनाचा स्वीकार करुन या संदर्भात जिल्हा पंचायत अभियांत्रिकी खात्याशी संपर्क साधून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर या संदर्भात पंडित ओगले यांनी जिल्हा पंचायत उपविभागाचे साहाय्यक कार्यकारी अधियंता आर. एस. खानापुरी यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली.
दोन-तीन दिवसात मार्ग काढणार
अभियंता आर. एस. खानापुरी यांनी मी उपअभियंत्यांसमवेत याची पाहणी करुन या तलावातील ज्यादा पाणी योग्य प्रकारे मार्गस्थ होण्यासाठी काय करावे याची माहिती ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास अधिकाऱयांनी दिली आहे. तरी देखील येत्या दोन तीन दिवसात पुन्हा एकदा याची पाहणी करुन शेतकऱयांचे होणारे नुकसान कशाप्रकारे टाळता येईल यासाठी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ता. प. अधिकाऱयांना घेतलेल्या शिष्टमंडळात राजू गुरव, रामदास गुरव, गोपाळ भेकणे, सुशांत गुरव, संतोष गुरव, राम हलगेकर, श्रीधर केसरकर, नामदेव गुरव, राम हलगेकर, परशराम गुरव व इतरांचा समावेश होता.