प्रतिनिधी/ बेळगाव
देशाला स्वातंत्र्य मिळवून 72 वर्षे झाली. तरीदेखील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक, असमानता अजूनही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही असमानता दूर करण्यासाठी घटनेमध्ये तरतूद केली होती. मात्र तळागळापर्यंत त्या कायद्याची सुविधा पोहचली नाही. त्यामुळेच अजूनही असमानता आहे. यासाठीच आता प्रत्येकांनी राज्यघटना समजून घेणे गरजेचे असल्याचे मत कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश नागमोहन दास यांनी व्यक्त केले.
न्यायाधिश नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आले आहे. त्या आयोगामध्ये जनतेच्या शिफारशी दाखल करण्याबाबत अनुसूचित जाती-जमातीच्या प्रमुख्यांकडून अहवाल स्वीकारण्यासाठी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अजूनही सामाजिक विषमता असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक विषमता दूर होण्यासाठी आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. देशामध्ये आता 4 हजार 535 एकूण जाती आहेत. त्यामध्ये 101 जाती अनुसुचित जाती, जमातीमध्ये समाविष्ट आहेत. मात्र राखीवताची टक्केवारी अजूनही तितकीच आहे. सर्वच समाजाचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे राखीवतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अजूनही शोषण व दबावतंत्र होत आहे. बुध्द, बसवाणा, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याविरोधात बंड पुकारला होता. नैतिक मूल्य जपत त्यांनी समानता आणण्याचा प्रयत्न केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे. त्या घटनेमुळेच आजपर्यंत दीन,दलितांना न्याय मिळाला आहे. तरी देखील अजूनही विविध जातींना न्याय मिळाला नाही. त्यांनाही देण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. कंत्राटी पध्दतीने कामगारांची भरती करुन घेतली जाते. त्यामध्ये राखीवता ठेवली जात नाही. सरकारी नोकरीमध्येही राखीवतेला बदल दिली जात आहे. त्याबाबत चिंतन होणे गरजेचे आहे. त्यासाठी चर्चा ही झाली पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बेळगाव विभागातील हावेरी, बागलकोट, विजापूर, बेळगाव, धारवाड, कारवार आणि गदग जिह्यातील अनेकांनी निवृत्त न्यायमूर्तींकडे आपला अहवाल सादर केला. याचबरोबर आपले विचारही व्यक्त केले. हा अहवाल स्वीकारुन जूनपर्यंत निश्चितच आयोगाच्या माध्यमातून विस्तार करण्याचा प्रयत्न मी करु, असे आश्वासन निवृत्त न्यायाधीश नागमोहन दास यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. चंद्रशेखर, सदस्य अनंत नाईक, राजशेखर मूर्ती, अहमद मुल्ला, महिला आणि बाल कल्याण खात्याच्या उमा सालीगौडर, बडिगेर आदी उपस्थित होते. अनंत नायक यांनी प्रास्ताविक केले. तर अनंत नायक यांनी आयोगाबाबतची माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये बेळगाव विभागात येणाऱया 7 जिल्हय़ातील जनतेकडून अहवाल स्वीकारण्यात आला. याचबरोबर अनेकांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले.
प्रारंभी मुरारजी देसाई शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन गीत म्हटले. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.