माजी मंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली
ऑनलाईन टीम / जालना :
परतूर तालुक्यातील वीज केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यासपीठावर बसलेल्या तहसिलदार मॅडमही हिरॉईनसारख्याच दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे लोणीकरांवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठत आहे.
वीज केंद्राच्या उद्घाटनानंतर बोलताना लोणीकर म्हणाले, शेतकऱयांना 25 हजार रुपयांचे अनुदान हवे असेल तर त्यांनी राज्यातील सर्वात मोठा मोर्चा काढायला हवा. तरच त्यांना अनुदान मिळेल.
या मोर्चासाठी मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू की एखादी हिरॉईन आणू, हे तुम्ही सांगा. हिरॉईन मिळाली नाही तर व्यासपीठावर बसलेल्या तहसिलदार मॅडमही हिरॉईनसारख्याच दिसतात, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी लोणीकर यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर उपस्थित होता.
लोणीकरांच्या या वक्तव्याचा तहसिलदार संघटनेने निषेध केला आहे. तर त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी असे संबधित महिला तहसिलदाराने म्हटले आहे.