प्रतिनिधी /फलटण
एका तरुणास शासनामार्फत मिळणारे अनुदान खात्यावर वर्ग करून देण्यासाठी 610 रुपयांची मागणी करून सदरची रक्कम स्वीकारताना फलटण तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागाच्या संगणक चालकास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडुन त्यास अटक केली आहे.
लाच लुचपत विभाग सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण तहसील कार्यालय येथील रोजगार हमी योजना विभागातील अमोल दिलीप जठार (वय 38 वर्षे राहणार बिरदेव नगर, जाधववाडी ता. फलटण) या संगणक चालकाने तक्रारदार तरुण यांची वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये रेशीम उद्योगसाठी आवश्यक असणारे शेड उभारणी करून त्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान तक्रारदार तरुणांच्या खात्यावर वर्ग करून देण्याच्या मोबदल्यात दारू व जेवनाचे पैसे असे एकूण 610 रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना संगणक चालक अमोल जठार यास तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावरील फलटण कृषी कार्यालय येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदरची लाचलुचपतची कारवाई झाल्याने फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक, ला. प्र. वी. सातारा अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, निलेश येवले लाप्रवि सातारा यांनी केली आहे.