इंग्लंडहून भारतात परतलेल्या व्यक्तीची कहाणी
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा प्रेरणादायी पोस्ट शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी ट्विटरवर एक स्टोरी शेअर केली आहे. ही कहाणी आहे ‘मटका मॅन’ची. हा व्यक्ती दिल्लीत पिण्याचे पाणी उपलब्ध करतो. या व्यक्तीचे पूर्ण नाव अलग नटराजन असून लोक त्यांना ‘मटका मॅन’ या नावाने ओळखतात.
नटराजन पंचशील पार्कमध्ये राहतात. ते दररोज स्वतःच्या एसयुव्हीला ड्राइव्ह करत पूर्ण दक्षिण दिल्लीत मातीच्या भांडय़ांमध्ये पिण्याचे पाणी भरतात, हे पेयजल वाटसरूंना मोफत मिळावे म्हणून त्यांची ही धडपड सुरू असते.

नटराजन यांनी या कामाची सुरुवात स्वतःच्या घराबाहेर मातीच्या एका मडक्याद्वारे केली होती. त्यानंतर ते पूर्ण दक्षिण दिल्लीत मडकं ठेवून त्यात पाणी भरू लागले. याचमुळे लोक त्यांना ‘मटका मॅन’ अशी हाक मारतात. ते दररोज पहाटे पाचला उटवून सुमारे 70-80 मडक्यांमध्ये पाणी भरतात.
इंग्लंडमध्ये होते वास्तव्य
एक सुपरहीरो जो पूर्ण मार्व्हल स्टेबलपेक्षा अधिक शक्तिशाली आहे…मटका मॅन’ असे महिंद्रा यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. नटराजन हे इंग्लंडमध्ये उद्योजक होते आणि त्यांनी कर्करोगावर मात केली होती. केवळ गरीबांची सेवा करण्यासाठी ते भारतात परतले आहेत. बोलेरोला या स्वतःच्या परोपकारी कार्याचा हिस्सा करून सन्मानित करण्यासाठी तुमचे आभार असे महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
लोकांना अन्नदान
नटराजन कामगार, मजुरांना आठवडय़ात दोन किंवा तीनवेळा भोजन उपलब्ध करविण्यासाठी ड्राइक्ह करतात. त्यांनी गरीब लोकांना सायकलमध्ये हवा भरण्याची सुविधा देण्यासाठी दक्षिण दिल्लीत सुमारे 100 सायकल पंप बसवले आहेत.