वार्ताहर / पंढरपूर
पंढरपूरकडे येणा-या रिक्षास मालट्रकची जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघात ३ जण ठार तर ४ जण जखमी झाले आहेत. सदरची घटना पंढरपूर – मोहोळ मार्गावरील देगाव हद्दीतील तांबोळी वस्ती येथे दूपारी चारच्या दरम्यान घडली आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंढरपूर मोहोळ मार्गावर असणा-या तांबोळीवस्ती येथे रिक्षा व मालट्रकची (एम.एच.१३सी.यू ५४६६) समोरासमोर धडक झाली. रिक्षा पंढरपूरकडे निघाली होती तर मालट्रक हा सोलापूरकडे निघाला होता. रिक्षाला जोराची धडक बसल्याने रिक्षाचे टप उचकटून रस्त्याच्या कडेला पडले होते. मालट्रकच्या पुढील टायराखाली एकजण सापडला होता तर रिक्षामध्ये दोघे अडकले होते.
अपघातामधील मयताचे नाव संदिप कोळी (रा.पंढरपूर) असल्याचे समजते इतर दोन मयत व चार जखमींची नावे समजू शकली नाहीत. रिक्षामध्ये एकूण सात प्रवासी प्रवास करीत होते. पोलिसांकडून मयम व जखमी व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अपघातानंतर पोलिस व नागरिकांनी अडकलेल्या व्यक्तींना बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.