ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानच्या सर्व प्रांतांवर कब्जा असल्याचा दावा केल्यानंतर तालिबानने सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी 6 देशांना निमंत्रण पाठवले आहे. त्यामध्ये चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि तुर्कस्तान या देशांचा समावेश आहे. तालिबानने यासाठी भारताला अद्याप संपर्क केलेला नाही.
तालिबानच्या निमंत्रणावरून हे स्पष्ट झाले आहे की, या 6 देशांच्या सरकारांनी यापूर्वीच तालिबानी संघटनेशी संपर्क साधला आहे. चीन, रशिया, तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांनी पूर्वीप्रमाणेच आपल्या दूतावासात काम करणे सुरूच ठेवले आहे.
दरम्यान, एक दिवस आधीच तालिबानचे प्रवक्ते झाबीला मुजाहिद यांनी पुढील आठवड्यापर्यंत सरकार स्थापनेला स्थगिती जाहीर केली होती.