अफगाणिस्तानातील शेकडो मुले आजारी
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. देशातील मानवी संकट दिवसेंदिवस अधिक विक्राळ होतेय. अन्न आणि पाण्याची अत्यल्प उपलब्धता असल्याने अनेक लोकांसमोर उपासमारीचे सकंट निर्माण झाले आहे. उपासमारीमुळे अनेक छोटय़ा मुलांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक मुले आजारी पडली आहेत.
देशातील घोर प्रांतात मुले उपासमारीने मरत आहेत. याप्रकरणी तातडीने उपाययोजना न करण्यात आल्यास वर्षाच्या अखेरपर्यंत लाखो मुलांना गंभीर आणि जीवघेण्या कुपोषणाला तोंड द्यावे लागू शकते. घोर प्रांतात मागील 6 महिन्यांमध्ये किमान 17 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचे आंतरराष्ट्रीय संस्थांनी म्हटले आहे.
रुग्णालयात दाखल केल्यावर मृत्यू झालेल्यांचा हा आकडा आहे. प्रत्यक्षात स्थिती अधिक खराब आहे, अनेक लोकांनी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला आहे. देशाच्या मध्य भागात शेकडो मुलांना उपासमारीचा धोका असल्याचे प्रांताचे सार्वजनिक आरोग्य संचालक मुल्ला मुहम्मद अहमदी यांनी म्हटले आहे.