प्रतिनिधी / बेळगाव
ऑक्टोंबर महिन्याचा प्रारंभ हा बेळगावच्या नागरीकांसाठी विशेष ठरला आहे. मागील 6 महिन्यांपासून बंद असणारी तिरूपती व कडाप्पा या शहरांची विमानसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तर म्हैसूरमार्गे चेन्नई शहरालाही कनेक्टिंग विमान देण्यात आल्याने चेन्नई पर्यंतचा प्रवास सुकर झाला आहे. त्यामुळे आता बेळगावमधून 9 शहरांना थेट विमानसेवा तर 2 शहरांना कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर 25 मे पासुन बेळगाव शहरातून विमान सेवेला प्रारंभ झाला. प्रारंभी काही मोजक्मयाच शहरांना विमानसेवा सुरू होती. त्यानंतर हळू हळू एकेक शहरांना विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या 9 शहरांना थेट विमान सेवेने बेळगावला जोडण्यात आले आहे. तर अजमेरला जाण्यासाठी इंदूर व अहमदाबाद या शहरातून कनेक्टिंग विमान तर चेन्नईला जाण्यासाठी म्हैसूर येथून कनेक्टिंग विमान देण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 11 शहरांना बेळगावमधून विमान प्रवास केला जाऊ शकतो.
मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी स्पर्धा
राज्यातील एक महत्त्वाचे विमानतळ म्हणून बेळगावच्या विमानतळाची ओळख निर्माण झाली आहे. लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात विमानतळाने केलेल्या प्रगतीमुळे प्रवासी संख्येत बेळगाव राज्यात तिसऱया स्थानी पोहचले आहे. पहिल्या क्रमांकावर बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ तर दुसऱया स्थानी मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत बेळगाव विमानतळाची मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी स्पर्धा सुरू आहे.
आठवडय़ातून तीन वेळा चेन्नई विमान सेवा
चेन्नई शहराला आठवडय़ातून तीन दिवस विमानसेवा देण्यात आली आहे. शुक्रवार, रविवार व मंगळवार असे तीन दिवस बेळगावमधून म्हैसूर व तेथून 20 मिनीटाच्या विश्रांतीनंतर विमान चेन्नईला जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून चेन्नईला विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून, विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर तिरूपती व कडाप्पा या दोन शहरांनाही थेट विमान सेवेने जोडण्यात आले आहे.
- या शहरांना थेट विमानसेवा – बेंगळूर, मुंबई, पुणे, हैद्रबाद, म्हैसूर, कडाप्पा, तिरूपती, अहमदाबाद व इंदूर
- कनेक्टिंग विमान – अजमेर, चेन्नई.