डॉ. शेखर साळकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
तिसरी कोरोना लाट आलीच तर त्यासाठी भारतीय जनता पक्षाने सज्जता केली असून राष्ट्रीय आरोग्य स्वयंसेवक मोहिमेची आखणी केल्याची माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे व मोहिमेचे गोवा प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली. या मोहिमेवरील राज्य पातळीवर 3 जणांची समिती स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ. साळकर यांच्यासह डॉ. स्नेहा भागवत, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांचा समावेश आहे.हे सर्वजण दिल्ली येथे जाऊन तेथे सदर मोहिमेचे प्रशिक्षण घेऊन आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
बूथ, मतदारसंघ, जिल्हा स्तरीय समित्या
त्यांनी सांगितले की उत्तर गोवा, दक्षिण गोवा जिल्हा पातळीवर या मोहिमेच्या कार्यवाहीसाठी समिती काढण्यात आली असून त्यात विविध डॉक्टर्सचा समावेश आहे. सदर मोहीम प्रत्येक मतदारसंघात नेण्यासाठी मंडळ पातळीवर म्हणजे 40 मतदारसंघातही समिती नेमण्यात आली असून प्रत्येक बुथवर (मतदान केंद्र) दोन जणांची नियुक्ती (एक पुरूष, एक महिला) करण्यात आली आहे.
आज पणजीत प्रशिक्षिणवर्ग
या सर्वाकरीता शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत पणजीतील भाजप कार्यालयात प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असून त्यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विनोदकुमार उपस्थित रहाणार आहेत.
ही मोहीम पक्षीय पातळीवर राबवली जाणार असून त्यात 60 डॉक्टर्सना सामील करण्यात आले आहे. त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून तिसऱया लाटेत लहान मुलांना (18 वर्षाखालील) जास्त धोका असल्याने त्यांच्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. या मोहीमेत भाजप कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षण मिळणार असून जनतेला मदत करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी पक्षीय पातळीवर ही तयारी करण्यात आली असून लोकांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.