वार्ताहर /उसगांव
तिस्क उसगांव येथे बेशिस्त पार्किंगमुळे निर्माण होणाऱया वाहतूक समस्येवर उपाययोजना आखण्यासाठी उसगांव पंचायत मंडळ व फोंडा वाहतूक पोलिसांनी पाहणी केली.
यावेळी उसगांव पंचायत मंडळातील रामनाथ डांगी, तुळशीदास प्रभू, दिनेश तारी व सीमा मास्कारेन्स, फोंडा वाहतूक पोलीस खात्यातील साहाय्यक उपनिरीक्षक महेश सांगोडकर व शिवाजी गांवस, विदेश रायकर, राजेंद्र देसाई, पीडीए मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञान नाईक व इतर नागरिक उपस्थित होते.
पीडीए मार्केटसमोर व तिस्क येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला सकाळी दुचाकी वाहने पार्क करून काही कामगार फोंडा, बेतोडा, कुंडई भागात कामाला जातात. दिवसभर ही वाहने इथेच पार्क करून असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. काही चारचाकी वाहनधारक रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवून बाजार करतात. फळे, फुले व भाजी विक्रेते दुकानासमोरील फुटपाथवर बसून व्यवसाय करतात. या सर्वांचा परिणाम वाहतुकीवर होत असतो. फुटपाथवर व दुकानासमोर बसणाऱया विक्रेत्यांना पीडीए मार्केटात बसविण्याची व्यवस्था करणे, दुचाकी व चारचाकी झोन करणे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
उसगांव पंचायत, फोंडा वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम खाते मिळून यासंबंधी उपाययोजना आखतील तसेच फोंडा वाहतूक पोलीस खात्याचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार असल्याची माहिती महेश सांगोडकर यांनी दिली.