आमदार वैभव नाईक यांच्या मुलीसह भाऊ व पीए कोरोना पॉझिटिव्ह : सेना पदाधिकाऱयांचेही स्वॅब
- ‘कोरोना’ एकूण रुग्णसंख्या 290
- कोरोना सक्रिय रुग्ण संख्या 40
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात बुधवारी आणखी दहाजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 290 वर पोहोचली आहे. कणकवली तालुक्यात पाच आणि कुडाळ तालुक्यात पाच रुग्ण नव्याने सापडले आहेत. कणकवली तालुक्यात सापडलेल्या पाचपैकी तीन रुग्ण हे आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कातील आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी ‘सेल्फ क्वारंटाईन’ झाले आहेत. बुधवारी त्यांनी कोरोना तपासणीसाठी स्वॅबही दिले. तसेच आतापर्यंत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱयांनीही स्वॅब दिले आहेत. एकूण 105 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्हय़ात बुधवारी दहाजणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. यामध्ये कुडाळ तालुक्यातील कुडाळ शहर – दोन, पावशी – एक आणि वर्दे – दोन, तर कणकवली तालुक्यातील कणकवली शहरातील बिजलीनगर – दोन, तेलीआळी – एक, हळवल – एक आणि कलमठ – एक या प्रमाणे रुग्ण आढळलेल्या गावांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱयांसह वरिष्ठ अधिकाऱयांची कोरोना तपासणी
आमदार वैभव नाईक प्रशासकीय बैठकांना उपस्थिंत राहिल्याने प्रशासनही हादरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांसह सर्वच वरिष्ठ अधिकारी सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह प्रमुख अधिकाऱयांनी कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिला आहे. तसेच शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांनीही सेल्फ क्वारंटाईन होत तपासणीसाठी स्वॅब दिले आहेत. या सर्व कोरोना तपासणी अहवालांकडे लक्ष लागून राहिले आहे.
आमदार नाईक यांच्या संपर्कात आलेल्यांचा अजूनही शोध सुरू आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने संपर्कातील व्यक्तीही मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र जे जवळच्या संपर्कात आहेत किंवा लक्षणे आहेत, त्यांचे प्राधान्यक्रमाने स्वॅब घेऊन तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. तसेच जिल्हय़ातील नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची लक्षणे दिसल्यास जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्हय़ात सक्रीय रुग्ण संख्या 40
जिल्हय़ात बुधवारी कोरोना बाधित दहा रुग्ण सापडल्याने कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 290 वर गेली आहे. दरम्यान मंगळवारी आणखी चार रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामुळे 290 पैकी 244 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. पाचजणांचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रीय 40 रुग्ण आहेत.
जिल्हास्तरीय नोडल अधिकारी डॉ. हेमंत वसेकर
जिल्हय़ात कोरोना विषाणूच्या चाचण्या, प्रयोगशाळांच्या कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी व प्रयोगशाळांचे कामकाज अधिक प्रभाविपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वर्दे वरची पालववाडी, भैरववाडी येथे कंटेनमेंट झोन
कुडाळ तालुक्मयातील कुडाळ येथील वर्दे वरची पालववाडी केंद्रबिंदू मानून वर्दे वरची पालववाडीच्या 500 मीटर परिसर क्षेत्रात, तर भैरववाडी-कुडाळच्या 800 मीटर परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही कंटेनमेंट झोनमध्ये 4 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे.
कणकवली बिजलीनगर येथे कंटेनमेंट झोन
कणकवली येथील बिजलीनगर येथील आमदार नाईक यांच्या घराजवळील 100 मीटरच्या परिसरामधील नऊ घरे, सहा कुटुंबे व 19 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4860
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4755
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 290
निगेटिव्ह आलेले नमुने 4470
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 105
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 40
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 244
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 67
बुधवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 3650
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 15743
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 61
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12567
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3115
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 144375