मुंबई \ ऑनलाईन टीम
प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, यासाठी सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन देखील केले आहे.
रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे मविआ सरकारचं यश आहे. उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!, असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
प्रश्नमकडून देशातील 13 राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, यासाठी सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. सर्व्हेमध्ये जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असून, त्यांना पुन्हा मतदान करू असे म्हटले आहे.