ऑनलाईन टीम / मुंबई :
तू गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर? असा उपरोधिक सवाल करत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारला इंधन दरवाढीबाबत त्याच्या 9 वर्ष जुन्या ट्वीटवरुन शालजोडे लगावले आहेत.
मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती. असे ट्वीट अक्षयकुमारने 16 मे 2011 रोजी केले होते.

2011 मध्ये केंद्रात यूपीए-2 अर्थात काँग्रेसप्रणित मनमोहन सिंह सरकार होते, तर महाराष्ट्रातही पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. आता मोदी सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले असताना अक्षयकुमारने मौन साधल्याने जितेंद्र आव्हाडांनी त्याला डिवचले.
अक्षयचे 9 वर्ष जुने ट्वीट अक्षरशः खणून काढत जितेंद्र आव्हाडां ‘कोट-रीट्वीट’ केले आहे. तू ट्विटरवर अॅक्टिव्ह नाहीस का? तू गाड्या वापरणं बंद केलंस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड मोठी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे, असे ट्वीट करत आव्हाडांनी अक्षयकुमारला मेन्शनही केले आहे.
दरम्यान, देशात सलग 19 व्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढ झाली आहे. दिल्लीत तर पहिल्यांदाच असे झाले आहे की, डिझेलची किंमत पेट्रोल पेक्षाही वाढली आहे. भारतात पहिल्यांदाच डिझेलची किंमत 80 रुपयांच्यापुढे गेली आहे. मागील 19 दिवसात डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 10.63 रुपयांनी तर पेट्रोल 8.66 रुपयांनी वाढ झाली आहे.