सेन्सेक्स 400, निफ्टी 120 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारप्रमाणेच मंगळवारीही शेअरबाजार सकाळच्या सत्रात मजबुती दर्शवत होता. पण एका वळणानंतर मात्र तो घसरू लागला. मंगळवारी सेन्सेक्स 413.89 अंकांनी घसरत 33956.69 वर तर निफ्टी 120 अंकांनी घसरण नोंदवत 10046.65 वर बंद झाला. सेन्सेक्समधील इंडसइंड, सनफार्मा, महिंद्रा आणि महिंद्रा, एचडीएफसी, एशियन पेंटस् यांनी तेजी दर्शवली. यासोबत अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी आणि टीसीएसही नफ्यात दिसले.
सुरूवात चांगली झाल्यानंतर मात्र बाजारात घसरण सुरू झाली. बँक निफ्टीही घसरणीत दिसत होता. निफ्टी बँक दुपारी दीड वाजता 50 अंकांनी खाली आला होता. गेल, बीपीसीएल, कोल इंडिया यांचे समभाग घसरले होते. दरम्यान फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये मात्र तेजी दिसून आली. गेल्या तीन महिन्यापासून या क्षेत्राची वाटचाल दमदार होताना दिसते आहे. सन फार्मा, लुपीन, ग्लेनमार्क फार्मा यांचे समभाग खरेदी करायला हरकत नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहेत. एकंदर पाहता फार्मा क्षेत्राला सकारात्मक प्रतिसाद दिसतो आहे.
मंगळवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्सने 100 अंकांची वाढ दर्शवत चांगली सुरूवात केली. कालचाच तेजीचा भाव मनी ठेवत बाजाराची वाटचाल सुरू झाली. 150 अंकांच्या वाढीसह शेअरबाजारात सेन्सेक्सची 34520.79 वर आणि निफ्टीची 10181.15 अंकासह सुरूवात झाली. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची स्थिती व विदेशी निधीत झालेली वाढ याचा परिणाम बाजारावर काहीकाळ दिसला. हिंडाल्को, टेक महिंद्रा, युपीएल, टाटा मोटर्स यांनी निफ्टीत तेजी नोंदवली तर गेल, इन्फ्राटेल, आयशर मोटर, नेस्ले, मारूती यांचे भाव घसरताना दिसले. दुसरीकडे सनफार्मा, एशियन पेंटस् व आयटीसी यांनी वधारत चांगली कामगिरी केली. सुरूवातीच्या सत्रात 83 अंकांनी तेजीसह सेन्सेक्स 34370.58 वर स्थिरावला होता तर निफ्टी 25 अंकांनी वाढीसह 10167.45 वर पोहचला होता. पण नंतर ही तेजी कायम टिकू शकली नाही.
दरम्यान विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 813.27 कोटी भांडवली बाजारात व्यवहारात आणले होते. जादा विदेशी गुंतवणुकीमुळेच सुरूवातीला सेन्सेक्स व निफ्टीत तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारात शांघाई, हाँगकाँग बाजार तेजी दर्शवत होते. युरोपियन बाजाराने मात्र घसरणीची वाट धरल्याचे पाहायला मिळाले. तो दबाव कमी अधिक प्रमाणात भारतीय बाजारावर दिसून आला.