हंसल मेहता यांची ‘स्कॅम 2003 ः द तेलगी स्टोरी’ सीरिज
दिग्दर्शक हंसल मेहता यांनी स्वतःची लोकप्रिय वेबसीरिज ‘स्कीम 1992 ः द हर्षद मेहता स्टोरी’च्या यशानंतर आता इतिहासातील दुसऱया मोठय़ा घोटाळय़ाची कहाणी सादर करण्याची घोषणा केली आहे. मेहता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. निर्मात्यांनी या नव्या सीरिजचे नाव ‘स्कॅम 2003 ः द तेलगी स्टोरी’ असे ठेवले आहे. तसेच या सीरिजमधील मुख्य नायकाच्या नावाचाही खुलासा केला आहे.

‘तेलगी मिळाला आहे, अब्दुल तेलगीच्या रुपात अत्यंत प्रतिभाशाली गगन देव रियारला सादर करत आहोत.’ असे हंसल मेहता यांनी म्हटले आहे. या सीरिजची निर्मिती अप्लॉज एंटरटेनमेंटकडून केली जाणार आहे. या सीरिजला हंसल मेहता आणि तुषार हीरानंदानी यांचे दिग्दर्शन लाभणार आहे. अनुभवी कलाकार गगन देव रियार या सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारणार आहे. ही सीरिज भारतातील सर्वात मोठय़ा घोटाळय़ांपैकी एक घोटाळय़ाच्या सूत्रधारावर आधारित आहे. अनेक राज्यांमध्ये फैलावलेल्या या घोटाळय़ाने पूर्ण देशाला हादरवून सोडले होते. तेलगी हा स्टँप पेपर घोटाळय़ाचा सूत्रधार होता. ‘स्कॅम 2003’ ही सीरिज पत्रकार संज सिंह यांच्या ‘रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावर आधारित आहे. स्कॅम 2003 ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.