श्रीधर मुळीक यांना ‘कै. बाबी कलिंगण पुरस्कार’ प्रदान
नेरुर येथे स्मृतिदिन साजरा
वार्ताहर / नेरुर:
तुझ्यासारखा हुशार मुलगा दशावतारात तळी फिरवतो, हे आम्हाला पटत नाही. तुझ्यामध्ये दशावतारी नाटकात प्रमुख स्त्राr भूमिका करण्याची गुणवत्ता ठासून भरलेली आहे. तू प्रयत्न कर. तुला सर्वतोपरी सहकार्य आमच्याकडून लाभेल…दशावतारी नटसम्राट कै. अनंत बागवे व कै. बाबी कलिंगण यांनी मला त्यावेळी अशा शब्दांत प्रोत्साहन दिले. त्यांच्या याच शब्दांनी मला प्रेरित केले आणि त्या द्वयींच्या मार्गदर्शनामुळे व माझ्या परिश्रमांतून पुढच्याच वर्षी मामा मोचेमाडकर दशावतार मंडळात प्रमुख स्त्राr भूमिका साकारुन या कलेत एक कलाकार म्हणून नावारुपास आलो…नेरुर येथे आठवणींचे पदर उलगडत होते ज्येष्ठ दशावतारी कलाकार श्रीधर मुळीक.
दशावतारी नटसम्राट कै. बाबी कलिंगण यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त येथील देसाईवाडा मित्रमंडळ व कलिंगण कुटुंबियांच्यावतीने नेरुर-देसाईवाडा येथे कलिंगण यांच्या निवासस्थानासमोरील रंगमंचावर आयोजित कार्यक्रमात मुळीक यांना यावर्षीचा ‘कै. बाबी कलिंगण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात जि. प. माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग) चे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या हस्ते बाबी कलिंगण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नेरुर सरपंच शेखर गावडे, दिलीप भंडारकर, उद्योजक देवेंद्र नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रीतम राणे, नेरुर माजी सरपंच चारुदत्त देसाई, अभिनेता विश्वजीत पालव तसेच देसाईवाडा मित्रमंडळ व कलिंगण परिवारातील सदस्य उपस्थित होते.
रणजीत देसाई यांच्या हस्ते मुळीक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख पाच हजार रु., मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. रणजीत देसाई व उमेश गाळवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देसाईवाडा मित्रमंडळ व कलिंगण कुटुंबियांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजा सामंत, तर आभार चारुदत्त देसाई यांनी मानले. यानंतर कलेश्वर दशावतार मंडळ नेरुरचे नाटक सादर करण्यात आले.