दळवटणे बैल वाहतूक प्रकरण, कंटेरनचा मुळ मालक वेगळाच
चिपळूण
काही दिवसांपूर्वी चिपळूण पोलिसांनी पकडलेला 16 बैल वाहतूक करणारा कंटेनर हा खास गुरे वाहतुकीसाठी बनवण्यात आला असून त्याची अंतर्गत मांडणी तशी करण्यात आली आहे. हा कंटेनर भाडय़ाने आणला गेला होता. त्याचा मुळ मालक हादेखील गुरे वाहतुकीत सराईत असल्याची माहिती पेलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
बुधवारी मध्यरात्री दळवटणे गावातून कंटेनरमधून या 16 बैलांची वाहतूक केली जात असतानाच पोलिसांनी सापळा रचून हा कंटेनर पकडला होता. यात अलिमिया चौघुले हा मुख्य सूत्रधार असून त्याने हे बैल आसपासच्या गावातून आणले होते. या प्रकरणी अतुल पवार, दुर्गेश जाधव यांनाही अटक करण्यात आली आहे. चौघुले याने हे बैल दळवटणे परिसरातील आसपासच्या गावांतून ज्या-ज्या शेतकऱयांकडून विकत घेतले त्या-त्या शेतकऱयांची पोलीस कसून चौकशी करणार आहेत. यातूनच चौघुले यास हे बैल नेमक्या कोणत्या कारणासाठी विकले गेले, हे पुढे येणार आहे. कंटेनरच्या मुळ मालकाचा शोध पोलीस घेणार असून कोकणात या कंटेनरचा वापर केला गेला का, हे चौकशीअंती बाहेर येणार आहे. दरम्यान, गुरे वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समेद बेग करीत आहेत.