सिंधुदुर्गला मोठा दिलासा : आणखी 32 रिपोर्ट निगेटिव्ह : 38 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा : होम क्वारंटाईनमध्ये 28 व्यक्ती वाढल्या
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात सापडलेल्या दुसऱया ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिच्या जवळच्या नातेवाईकासह सर्व 28 व्यक्तींचे कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे गरोदर महिलेला सोडण्यासाठी आलेल्या कोल्हापूरच्या ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जिह्यातील चारही व्यक्तींचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गला मोठा दिलासा मिळाला आहे. तर आणखी 32 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 38 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली.
मुंबईवरून आलेली 17 वर्षीय युवती 29 एप्रिलला ‘कोरोना’ बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला असता एकूण 28 व्यक्ती संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले. त्यातील 12 व्यक्ती जोखमीच्या संपर्कात आल्या होत्या. यापैकी सहा व्यक्तोंचा रिपोर्ट शनिवारीच निगेटिव्ह आला होता. तर सहाजणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा होती. रविवारी त्या सहाजणांसह उर्वरित सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच सावंतवाडी- ओटवणे येथे गरोदर महिलेला तिच्या माहेरी सोडून गेलेला कोल्हापूरचा चालक ‘कोरोना’बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. सिंधुदुर्गातील चार व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
आणखी 32 रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत ‘कोरोना’ तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आलेले आणखी 32 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर नव्याने 38 जणांचे नमुने पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. आतापर्यंत एकूण 440 नमुन्यांची तपासणी झाली. त्यातील 438 नमुने निगेटिव्ह, तर दोन नमुने पॉझिटिव्ह आले. या दोनपैकी एक पॉझिटिव्ह रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाला असून एका रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
‘होम क्वारंटाईन’मध्ये 28 जणांची वाढ
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये पाच रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या 73 व्यक्ती दाखल असून त्यातील 57 या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये तर 16 व्यक्ती या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. होम क्वारंटाईनमध्ये 28 जणांची वाढ होऊन एकूण 320 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तसेच संस्थात्मक विलगीकरणात 142 व्यक्ती आहेत. रविवारी आरोग्य विभागामार्फत एकूण 2632 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
अ. क्र. विषय संख्या
1 घरीच विलगीकरण करण्यात आलेले 320
2 संस्थात्मक विलगीकरणात असलेले 142
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 478
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 440
5 आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 2
6 निगेटिव्ह आलेले नमुने 438
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 38
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 73
9 सध्यस्थितीत जिह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 1
10 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2632