प्रतिनिधी/ गोडोली
त्रिपुटी येथील 37 वर्षाची पुरुष व्यक्ती कोरोना बाधित असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे कुटुंब आणि अन्य संपर्कातील 23 जणांना ब्रम्हपुरी येथे क्वाँरंटाईन करण्यात आले आहे. त्रिपुटी आणि परिसरातील नागरिकांना प्रशासनाने योग्य खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती ग्रामसेवक अभिजित चव्हाण यांनी दिली.
जिह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून त्रिपुटी येथील एका ट्रकचालकाला संसर्ग झाला असल्याचे समोर आली आहे. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील तसेच परिसरातील 23 व्यक्ती संपर्कात आल्याचे समोर आले आहे.त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने योग्य खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या आहेत.तसेच परिसर सील केला असून योग्य उपाययोजना करण्यात आल्याचे सरपंच सिंधू काटकर यांनी सांगितले.
शनिवारी रात्री उशिरापासून गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून प्रांताधिकारी किर्ती नलावडे, तहसीलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,पोलीस उपनिरीक्षक सुनील गोडसे,तालुका आरोग्य डॉ.जाधव या अधिकायांनी भेट देऊन सुचना दिल्यानुसार काळजी घेत असल्याचे उपसरपंच यमाजी कुंभार यांनी सांगितले.
संबंधित व्यक्ती ट्रक चालक असून त्यांच्या समवेत अन्य तीन चालकांना क्वाँरंटाईन केले आहेत. कोरेगाव तालुक्यातील हा दुसरा रुग्ण असून संपूर्ण तालुक्यातील प्रशासन अधिक सतर्क झाले असे पोलीस पाटील सुषमा शेडगे यांनी सांगितले.
तलाठी गायकवाड, आरोग्य सेविका मीना मोरे,राहुल माने, सागर काटकर, महेश माने,संजय काटकर यांच्या सह पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ काळजी घेत आहेत.