उनाकोटी मंदिरात 99 लाख 99 हजार 999 दगडाच्या मूर्ती
त्रिपुराची राजधानी अगरतळापासून सुमारे 145 किलोमीटर अंतरावर उनाकोटी मंदिर आहे. हे मंदिर ईशान्य भारतातील सर्वात मोठय़ा रहस्यांपैकी एक मानले जाते. हे ठिकाण कित्येक वर्षांपर्यंत अज्ञात स्वरुपात तेथे अस्तित्वात राहिले, पण अद्याप अनेक लोक या ठिकाणाचे नाव देखील जाणत नाहीत. जंगलामधील शैलचित्रे आणि मूर्तींचे भांडार असलेले ‘उनाकोटी’ जितके अद्भूत आहे, त्याहून अधिक त्याचा इतिहास रंजक आहे.
तेथे एकूण 99 लाख 99 हजार 999 दगडाच्या मूर्ती आहेत, या मूर्तींच्या रहस्याची अद्याप कुणालाच उकल करता आलेली नाही. या मूर्ती कुणी तयार केल्या, कधी निर्माण केल्या, त्यामागील कारण काय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक कोटीत एकच कमी का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पण यामागे अनेक कहाण्या प्रचलित असून त्या हैराण करणाऱया आहेत.
या कारणामुळे मिळाले नाव
रहस्यपूर्ण मूर्तींमुळेच या ठिकाणाला उनाकोटी नाव पडले असून याचा अर्थ कोटीत एक कमी असा होतो. या ठिकाणाच्या मुख्य आकर्षणांमध्ये भगवान गणेशाच्या अद्भूत मूर्ती आहेत. यात गणेशाच्या चार भूजा आणि तीन दंत दर्शविण्यात आले आहेत. भगवान गणेशाची अशी मूर्ती क्वचितच कुणी पाहिली असेल. याचबरोबर तेथे भगवान गणेशाच्या 4 दंत आणि 8 भुजा असलेल्या आणखीन दोन मूर्ती आहेत. या अद्भूत मूर्तींमुळेच हे ठिकाण अधिकच रंजक ठरते.