हृदय हा शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. शरीराचे अस्तित्व त्याच्यावरच अवलंबून असते. तथापि आपल्या काही वाईट सवयी हृदय कमजोर करू शकतात. नुकत्याच झालेल्या संशोधनातून हृदयाबद्दलचे एक महत्त्वाचे सत्य उघड झाले आहे. ते असे आहे की थंडीच्या दिवसात हृदयाचा धोका सहा पट अधिक वाढतो. सर्वसाधारण समजूत अशी असते की थंडीच्या दिवसात सर्दी, पडसे, खोकला इत्यादी आजार बळावतात. तथापि थंडीच्या दिवसातच या आजारांपेक्षा हृदयाच्या आजारांचे प्रमाण अधिक वाढते. विशेषतः थंडीच्या मोसमाच्या प्रारंभी हा धोका अधिक वाढतो. हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना याच कालावधीत सर्वाधिक असतात. नंतर हळुहळू थंडीची सवय शरीराला होत जाते आणि हृदयविकारांमध्येही काही प्रमाणात घट होऊ शकते.

त्यामुळे हिवाळय़ाच्या दिवसात हृदयाची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी पचायला सोपा आहार, प्रोटीनचे प्रमाण वाढविणे, मर्यादित व्यायाम करणे, जडपदार्थांचे सेवन टाळणे, भरपूर पाणी पिणे, तसेच आहारामध्ये फळे, भाज्या इत्यादींचा समावेश मुक्तहस्ते करणे, मलावरोध (कॉन्स्टिपेशन) होणार नाही याची दक्षता घेणे इत्यादी उपाय करण्याचा सल्ला तज्ञ डॉक्टर देतात.