परीक्षा घेण्यास मान्यता : केंद्राच्या परवानगीमुळे झाले शक्य : विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची सूचना
प्रतिनिधी / पणजी
आज गुरुवारपासून सुरू होणाऱया गोवा शालांत मंडळाच्या दहावीच्या परीक्षा घेण्यासाठी गोवा सरकारने एका रात्रीत केंद्रीय गृहमंत्रालयाची मान्यता मिळवल्याने सदर परीक्षेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्पष्ट नकार दिला आहे. परीक्षेला हरकती घेणाऱया सर्व याचिका खंडपीठाने फेटाळाल्या आहेत.
मंगळवार दि. 19 मे रोजी खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी प्रामुख्याने दोन मुद्यांवर खडाजंगी झाली होती. त्यावर केंद्र सरकारने बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत योग्य ते उत्तर द्यावे स्पष्ट केले होते. रात्र असल्याने केंद्रीय गृहमंत्रालकडे सल्ला मसलत होऊ शकली नाही, असे उत्तर चालणार नाही, असे खंडपीठाने भारताचे सॉलिसिटर जनरल प्रविण फळदेसाई यांना बजावले होते.
बदलत्या परिस्थितीत जोखीम घेऊ शकते काय?
खंडपीठाला दोन मुद्यांवर स्पष्टीकरण हवे होते. दि. 1 मे व दि. 17 मे 2020 रोजी केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाने दोन अधिसूचना जारी केल्या होत्या. त्यात लॉकडाऊन काळात सर्व शैक्षणिक व्यवहार बंद ठेवण्याचा स्पष्ट आदेश होता. त्यात परीक्षेचा समावेश आहे की नाही, हे स्पष्ट नव्हते. तसेच त्यावेळी गोव्यातील कोविड 19 चे सातही रुग्ण बरे झाल्याने गोवा ग्रीन झोनमध्ये गेला होता. आता रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या सुरक्षेच्या मुद्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. गोवा सरकार आणि गोवा शालांत मंडळ अशा परिस्थितीत जोखीम घेऊ शकते काय? अशी विचारणा झाली होती.
परीक्षा घेण्याबाबत मागितले होते स्पष्टीकरण
आता लॉकडाऊनचा काळही 31 मेपर्यंत वाढवण्यात आला. या काळात परीक्षा घेण्यास केंद्राने मान्यताही दिलेली नाही. वरून शैक्षणिक व्यवहार बंद ठेवावेत, असे स्पष्ट केले आहे. शैक्षणिक व्यवहारात परीक्षेचाही समावेश होत आहे काय, याची विचारणाकरून खंडपीठाने स्पष्टीकरण मागितले होते.
केंद्रीय गृह व्यवहार सचिवांकडे केला अर्ज
परीक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची मान्यता नसल्याचे स्पष्ट होताच गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी केंद्रीय गृह सचिव ए. के. भल्ला यांना ई मेल पाठवून दहावी, बारावीच्या परीक्षेची सत्य स्थिती सांगितली.
केंद्राला कळविली गोव्याती सद्यस्थिती
दि. 4 एप्रिल 2020 पासून सदर परीक्षा होणार होती. पण दि. 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. आता 6 जून पासून पावसाळा सुरू होणार आहे. अशा स्थितीत परीक्षा आणखी पुढे ढकलणे कठीण जाईल. ही परीक्षा मुलांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या गोव्यात एकही स्थानिक कोरोनाबाधित रुग्ण नाही. पावसाळ्यात फ्लू सारखा आजार वाढतो. व्हायरल फिवर येतो. पावसाळी पाण्यात रस्ते बुडतात. वाहतूक खोळंबते. त्यामुळे आताच 20 व 21 मेपासून परीक्षा घेण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
परीक्षा केंद्रात पूर्ण काळजी घेतली जाईल. मास्क व सेनिटायझरचा वापर, एका वर्गात फक्त 12 मुले बसतील, संपूर्ण शाळा, वर्ग, रेलींग सेनिटायझ केले जाईल. आरोग्य केंद्र आणि इस्पितळातील साहाय्यक तैनात केले जातील. शरीराचे तापमान तपासून प्रवेश दिला जाईल. त्यामुळे काळजी नसावी. योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन देऊन सदर मान्यता मागणारे पत्र ईमेलद्वारे पाठविण्यात आले होते.
याचिकादारांच्या वकिलांनी वाद घातला नाही
याचिकादार सेड्रिक वाझ, केनिथ वाझ, डॉ. अद्वैत देसाई, व्योम देसाई, निखिल साधले, श्लोक साधले, शैलेंद्र शिंक्रे, रामकृष्ण शिंक्रे, नहिदा बी खान महम्मद फरीज शेख, शिर्ली फर्नांडिस, रुबीन फर्नांडिस, ट्रिना सिक्वेरा, सेनिफा सिक्वेरा, पिटर फिग्रेडो, फ्रांसिस फिग्रेदो, माथिएस लोबो, शानिया लोबो, विठ्ठल पै, श्रमिक पै, पेट्रेशिया डिसोझा, पियूश हरमलकर, यांनी सदर याचिका सादर करून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती.
दत्तप्रसाद लवंदे आणि लक्ष्मीकांत वायंगणकर यांनी हस्तक्षेप याचिका सादर करून परीक्षा नियोजित वेळेतच घ्याव्यात अशी याचना केली होती.
याचिदाराच्या वतीने ऍड. रायन मिनेझीस आणि ऍड. ए. एफ दिनिझ यांनी बाजू मांडली. केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने परीक्षा घेण्यास मान्यता दिल्याने आता कोणतीच हरकत नसल्याचे सांगून या वकिलांनी आणखी वाद घातला नाही. परीक्षा घेण्यात जोखीम आहे यावर त्यांनी भर दिला.
गोवा सरकारच्यावतीने ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी बाजू मांडली. फक्त फर्निचरच नव्हे पूर्ण शाळा सेनिटाईझ केली जाईल, रेलिंग, दरवाजे, नॉब, हँडल तसेचज्या ठिकाणी संपर्क होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सेनिटाईझ केले जाईल, शौचालयात साबण ठेवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
खंडपीठाने केली प्रशंसा
एजी पांगम तसेच साहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रविण फळदेसाई यांच्यासह याचिकादारांच्या वकिलांची खंडपीठाने प्रशंसा केली. याचिकादाराच्या वकिलांनी विरोधासाठी विरोध न करता पूर्णपणे योग्य बाजू मांडली अशी टिपणी खंडपीठाने केली.
परीक्षेपेक्षा आरोग्य महत्वाचे
दहावीची परीक्षा जीवनात मैलाचा दगड ठरत असली तरी परीक्षेपेक्षा आरोग्य महत्वाचे आहे हे गोवा शालांत मंडळाने लक्षात ठेवावे आणि खंडपीठाला दिलेल्या हमीचे तंतोतंत पालन करावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुरळीत ठेवा
शाळांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. प्रत्येक केंद्रात किमान एक पोलीस असेल असे आश्वासन सरकारने दिले. त्यावेळी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवा व मुले वेळेत परीक्षा केंद्रात पोहोचतील याची काळजी घ्या, अशी सूचना खंडपीठाने केली.
रात्री 12 वाजता केंद्र सरकारकडून मिळाली मान्यता
मुख्य सचिव परिमल राय यांना रात्री 12 वाजून 19 मिनिटांनी केंद्राकडून सदर पत्राचे उत्तर आले. केद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संयुक्त सचिव संजीव कुमार जिंदाल यांनी सदर ईमेल पाठवला होता. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी लिहिलेल्या या पत्रात दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यास सूट मागितली होती ती देण्यात आल्याचे म्हटले होते. परीक्षा केंद्रात प्रवेश करणाऱया प्रत्येकाचे थर्मल स्पॅनिंग झाले पाहिजे. विद्यार्थी व शिक्षकांनी मास्क वापरून किमान दोन मिटरचे अंतर राखावे, अशा अटी त्या पत्रात घातल्या आहेत.

दहावीची परीक्षा आजपासून
शाळा, मंडळ सरकारकडून जय्यत तयारी : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक सविधा : मदतीसाठी स्वयंसेवक, अधिकारी तैनात
प्रतिनिधी / पणजी
दहावीची परीक्षा आज गुरुवार 21 मे पासून सुरू होत असून ती 6 जूनपर्यंत चालणार आहे. गोवा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) त्या परीक्षेची जय्यत तयारी केली असून गोव्याच्या सीमेपलिकडील मुलांची तेथेच परीक्षेची सोय केली आहे. दरम्यान, बारावीची उर्वरीत परीक्षा काल बुधवारपासून सुरळीत चालू झाली असून मराठी पेपर घेण्यात आला.
दहावी परीक्षा एकूण 29 केंद्रातून घेण्यात येणार असून त्यासाठी 19680 परीक्षार्थी आहेत. 9790 मुले तर 9890 मुलींचा त्यात सामावेश आहे. सीमेपलिकडील मुलांसाठी एकूण 6 उपकेंद्रांची सोय करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिह्यात (महाराष्ट्र) चार तर कर्नाटकात 2 उपकेंद्रे निश्चित करण्यात आली असून तेथील मुले त्या केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. आरोंदा, पत्रादेवी, सातार्डा, भेडशी अशा 4 ठिकाणी तर चोर्ला खानापूर व माजाळी कारवार या दोन ठिकाणी ती उपकेंद्रे विकसित करण्यात आली आहेत. त्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱयांची अनुमती घेण्यात आल्याचे बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.
सकाळी 9 वाजता सुरु होणार पेपर
परीक्षेचे सर्व पेपर्स सकाळी 9 वाजता चालू करण्यात येणार असून 30 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सुरू झाल्यावर 30 मिनिटानंतर आलेल्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून परीक्षेसाठी 10 मिनिटे जादा दिली जाणार आहेत.
प्रत्येक परीक्षार्थिंची थर्मल गनने तपासणी करण्यात येणार असून मास्क वापरणे, हात सॅनिटाईझ करणे सक्तीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. सामाजिक अंतराचे पालनही करण्यात येणार असून पालकांना परीक्षा केंद्रात संकुलात, आवारात सोडण्यात येणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. फक्त परीक्षार्थीना प्रवेश मिळणार आहे.
बारावीची परीक्षा सुरु
बारावी परीक्षेचे उर्वरीत पेपर्स काल बुधवारपासून सुरू झाले. 3818 जणांनी बुधवारी मराठीची परीक्षा दिली. आज गुरुवारी पॉलिटिकल सायन्स तर उद्या शुक्रवारी भूगोल पेपर होणार आहे. काल सर्वांना थर्मलगनने तपासणी करून वर्गांत सोडण्यात आले. तसेच त्यांनी गर्दी करू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे म्हणून दक्षता घेण्यात आली. बारावीची परीक्षा शुक्रवारी संपणार आहे.