46 लाखांचा मुद्देमाल जप्त- आंचल दलाल व रितू खोखर यांचा धडाका
प्रतिनिधी/ सातारा
सध्या वाळू मिळणे प्रचंड मुश्किल व महाग झालेय. यामध्ये बांधकामाला चोरटी वाळू विकण्याचा उद्योग त्या त्या भागात हे सर्व कोणाच्या ना कोणाच्या वरदहस्ताने सुरुच आहेत. मात्र, नव्याने दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल व सहाय्यक पोलीस अधिक्षक रितू खोखर यांनी वाळू माफियांवर धडक कारवाई करत वाळू चोरांचा पर्दाफाश केला आहे. कोरेगाव तालुक्यातील दहिगाव हद्दीत कारवाई करत चारजणांना ताब्यात घेतले असून यावेळी 46 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या धडक कारवाईने जिल्हय़ातील वाळूमाफियांच्या काळजात धडकी भरली असून दि. 7 रोजी ही कारवाई झाली आहे. वाठारस्टेशन, (ता.कोरेगाव) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु असल्याची खबर मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंन्सल व अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक आचंल दलाल व रितू खोखर यांनी मध्यरात्री या वाळू तस्करीचा पर्दाफाश करण्याचा निर्धार केला.
गोपनीय माहितीनुसार दलाल व खोखर यांनी पोलीस हवालदार दादासाहेब बनकर, पोलीस कॉन्स्टेबल मनोज शिंदे, वैभव शिंदे, शुभम चव्हाण, निलेश जांभळे, इंद्रजित भोसले, प्रकाश मेश्राम, राजकुमार घोरपडे, अमोल गिरी, प्रसाद शिंदे, माधव ढोकळे या टीमच्या सहकार्याने रात्री 10.30 च्या सुमारास दहिगाव ते दिघवाडी हद्दीतील मळकी नावाच्या शिवारात छापा टाकला.
यावेळी तिथे अवैध वाळू उपसा करणाऱया रुपेश गुलाबराव चव्हाण, अभय विष्णू चव्हाण (दोघे रा. दहिगाव, ता. कोरेगाव) व किरण आनंदा माने (रा. वाठारस्टेशन, ता. कोरेगाव), अमित बबन कदम (रा. देऊर, ता. सातारा) यांना ताब्यात घेतले. या छाप्यात त्यांच्या कब्जातून 50 ब्रास वाळू, 1 पोकलॅन, 2 ट्रक्टर ट्रॉलीसह, 1 बलेरो जीप, 1 मोटार सायकल, 1 डंपर, 1 जेसीबी असा एकूण 46 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या संशयितांवर वाठारस्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सहभागी असलेल्या आणखी संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत.