ऑनलाईन टीम / पुणे :
राज्यपालांचे वय झाले आणि शरद पवार साहेब यांचे वय झाले नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर पलटवार करताना केला होता. त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादा, तुमचे जेवढे वय आहे तेवढी शरद पवार साहेबांची संसदीय कारकीर्द आहे, असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. वयोमानामुळे राज्यपालांना लक्षात राहत नसावे म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या मदतीला धावून जात पवारांवर टीका केली होती. पहिली गोष्ट राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्टी चंद्रकांतदादा तुमचे जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावे, असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे .
पुढे त्या म्हणाल्या, दादा, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी तुम्हाला भेट नाकारली. याचे जरा आत्मचिंतन करा. तेव्हाच कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवर काय बोलावे याचे तुम्हाला भान येईल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.