प्रतिनिधी/ दापोली
दापोली नगर पंचायत कार्यालयाला जिल्हाधिकाऱयांनी भेट देऊन प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. तसेच दापोलीत शासकीय जागेवर असणारे अनधिकृत खोके 8 दिवसांच्या आत काढून टाकण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. यामुळे दापोलीत खळबळ माजली आहे.
दापोली नगर पंचायतीचे विविध प्रश्न समजावून घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नगरपंचायतीला भेट दिली. प्रथम त्यांनी नगर पंचायतीच्या कर्मचाऱयांची बैठक घेऊन सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर नगरसेवक व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱयांबाबतच्या तक्रारीं जिल्हाधिकाऱयांना सांगितल्या. शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत खोके उभारण्यात आलेले असतानाही त्याकडे नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रारही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली. यावर महसूल, सार्वजनिक बांधकाम व नगर पंचायत यांनी संयुक्तपणे कारवाई करत रस्त्यावरील सर्व दुकानांची अतिक्रमणे 8 दिवसांत काढून टाकावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी मुख्याधिकाऱयांना दिले. तसेच कारवाईअगोदर कोणीही न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश आणू नये, यासाठी कॅव्हेट दाखल करावे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
शहरातील प्रस्तावित डीपी रोडवर बांधकाम करण्यात आलेले असूनही नगर पंचायत प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याची तक्रार नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी केली, तर नगरसेवकांनी माहिती मागूनही ती दिली जात नसल्याने नगरसेवकांना आता माहिती अधिकाराच्या कायद्याखाली माहिती मिळवण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाकडे अर्ज करावा लागत असल्याचे काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांना सांगितले. नगर पंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या चारही बाजूंनी पवनउर्जेसाठी मनोरे उभारले आहेत. मात्र पवनऊर्जा व सौरउर्जेचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून बंद असल्याने व हे मनोरे आता धोकादायक झाल्याने ते काढून टाकण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत झालेला असतानाही या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नसल्याने हे धोकादायक असलेले मनोरे कोसळून मनुष्यहानी होण्याची चिंता पत्रकारांनी जिल्हाधिकाऱयांकडे व्यक्त केल्यावर तातडीने या चारही मनोऱयांचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी मुख्याधिकाऱयांना दिले. तसेच काणे हॉस्पिटलसमोर असलेली शासनाची जागा हॉकर्स झोन म्हणून आरक्षित ठेवण्यात आली असून ती जागा नगर पंचायतीकडे हस्तांतरित झालेली नसतानाही तेथे अनधिकृतपणे कायमस्वरुपी खोक्यांचे बांधकाम करण्यात आले असून त्याकडे महसूल विभाग व नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची बाब नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिली. आपण केलेल्या सर्व तक्रारींवर येत्या 15 दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी उपस्थितांना दिले. यानंतर जिल्हाधिकारी मिश्रा, मुख्याधिकारी महादेव रोडगे, तहसीलदार वैशाली पाटील यांनी गाडीतून दाभोळ रस्त्यावर असलेले खोक्यांचे अतिक्रमण, कामगार गल्लीमध्ये बांधण्यात आलेले गाळे यांची पाहणी केली. तसेच नगर पंचायतीने मंडणगड मार्गावर बांधलेल्या मच्छीमार्केटचीही पाहणी केली.