प्रतिनिधी / दापोली
झाडे वाहतुकीसाठी तपासाची मागणी करण्याकरिता आलेल्या तक्रार दाराकडून सहा हजार पाचशे रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दापोलीतील गणेश खेडेकर वनपाल व सचिन आंबेडे हे अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांचा लाकूड विक्रीचा व्यवसाय आहे. त्याकरीता त्यांनी दापोली येथील शेतकरी यांचेकडून तोडणी केलेली झाडे, जळाऊ लाकूड व इमारती लाकूड विकत घेतली. सदर झाडे तोडण्याकरीता वनविभागाची परवानगी घेण्यात आली असून, तोडलेल्या झाडांच्या लाकडांची वाहतुकीच्या पासाची मागणी करणेकरीता तक्रारदार यांनी परिमंडळ वन अधिकारी दापोली यांचे कार्यालय येथे जावून वरील आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांची दिनांक 20 ऑगस्ट रोजी भेट घेतली. त्यावेळी आरोपी लोकसेवक व खाजगी दसम यांनी तक्रारदार यांचेकडे प्रत्येक वाहतुकीच्या पासकरीता १,३००/- रूपये प्रमाणे ५ पासांची ६,५००/- रूपये रक्कमेची लाचेची मागणी केली. पंरतू सदर लाकूड वाहतुकीच्या पासकरीता शासकिय फि रू. १००/- इतकी असताना आरोपी लोकसेवक व खाजगी इसम तक्रारदार यांचेकडे ५ वाहतुकीच्या पासकरीता ६,५००/- रूपये इतक्या रक्कमेची लाचेची मागणी करत असल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांचेकडे दिली होती.
सदर तकारीचे अनुषंगाने 3 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आरोपी खेडेकर यांनी तक्रारदार यांचेकडे लाकूड वाहतुकीच्या पासकरीता १,३००/- रूपये प्रमाणे ५ वाहतुकीच्या पासकरीता ६,५००/- रूपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती १,०००/- रूपये प्रत्येकी प्रमाणे ०५ वाहतुकीच्या पासांचे ५,०००/- रूपये त्यांचे कार्यालयात काम करणारे खाजगी इसम सचिन आंबेडे मार्फत स्विकारण्याचे मान्य केले.
पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्यानुसार दिनांक ०३ सप्टेंबर रोजी सापळा आयोजित करण्यात आला असता, आरोपी लोकसेवक गणेश खेडेकर याचे सांगणेनुसार साजगी इसमाने तकारदार यांचेकडुन लाच रक्कम ५,०००/- रुपये आरोपी खेडेकर यांचेसाठी व स्वत:साठी वनक्षेपाल कार्यालय दापोली येथे स्विकारल्यानंतर खाजगी इसम आंबेडे यांना परिमंडळ वन अधिकारी दापोली यांचे कार्यालय दुपारी 4 वाजताचे सुमारास पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी लोकसेवक खेडेकर व सचिन आंबेडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची सापळा कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण कदम व त्यांचा स्टाफ पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस नाईक बिशाल नलावडे, पोलीस नाईक, योगेश हुंबरे यांनी केली आहे.