8 नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ दापोली
नगरपंचायतीच्या मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचे पालन न करता विनापरवाना विजयी मिरवणूक काढल्या प्रकरणी ठपका ठेवून निवडून आलेल्या तब्बल 8 नगरसेवकांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकालाच्या अनुषंगाने सीआरपीसी 149 प्रमाणे नियमांचे उल्लंघन करु नये यासाठी दापोली पोलीस ठाण्यामार्फत येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना नोटीस बजावण्यात आलेली होती. 19 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने गोपनीय अंमलदार सुहास पाटील, दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक नितीन ढेरे व 35 कर्मचारी असे बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले होते. सकाळी 7 वाजल्यापासून सर्व अंमलदार व अधिकारी असे बंदोबस्तावर तहसील कार्यालय व परिसरात हजर होते.
सकाळी 10 च्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी निकालाची प्रक्रिया सुरु करुन विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरूवात केली. सकाळी 10 ते दुपारी 12 च्या दरम्यान दापोलीलीत खालीद अब्दुल्ला रखांगे, मेमन अरिफ गफुर, अन्वर अब्दुल गफुर रखांगे, संतोष दत्ताराम कलकुटके, विलास राजाराम शिगवण, मेहबूब कमरुद्दीन तळघरकर, रवींद्र गंगाराम क्षीरसागर, अजिम महमद चिपळूणकर व इतर उमेदवारांनी 100 ते 150 कार्यकर्ते जमवून निवडणुकीतील विजयानिमित्त घोषणाबाजी करत व वाद्ये वाजवत विजयोत्सव साजरा केला. यावेळी त्यांना बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदारामार्फत कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत समजावण्यात आले, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. याद्वारे त्यांनी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशांचे उल्लघन केले. यावेळी पोलीस ठाणे अंमलदार व सरकारी कर्मचाऱयामार्फत व्हिडीओ शुटींगही करण्यात आले.
याप्रकरणी सरकारतर्फे त्यांच्याविरुद्ध भा. दं. वि. क. 269, 270, 34, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005चे कलम 51(1) (ब), प्रमाणे दापोली पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी कायद्याचे पालन करून लोकांसमोर आदर्श घालून द्यायचा असतो. मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर येथील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना याचा विसर पडलेला दिसून येत असल्याची चर्चा दापोलीमध्ये सुरू आहे.