प्रतिनिधी/ कुडचडे
कुडचडे पोलिसांनी निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कुडचडे-दाबामळ येथे छापा टाकून एका व्यक्तीला गांजासह पकडले. दाबामळ येथील एका निर्जन घरातून अटक करण्यात आलेला सदर संशयित आरोपी शंकर मंगल सावन्सी (वय 23) हा मूळ रांची, झारखंड येथील असून तो सध्या कामराळ येथे वास्तव्य करून होता. त्याच्याजवळ 29 ग्रॅम गांजा सापडल्याची माहिती निरीक्षक देसाई यांनी दिली.
कुडचडेत गांजासह एकाला अटक केल्यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे. कुडचडेत जास्त प्रमाणात पर्यटक येत नसतात तसेच दुसऱया राज्यांतून येणाऱयांची वर्दळ कमीच असते. तरीही कुडचडेत गांजा पोहोचल्याने स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. या प्रकरणात कोण-कोण गुंतले आहे आणि त्याचा सूत्रधार शोधून काढण्यात कुडचडे पोलिसांना यश प्राप्त होऊ शकेल का अशी चर्चा कुडचडे परिसरात चालली होती. अमली पदार्थांना रोखण्यासाठी जागृती व कारवाई करण्यात येत असली, तरी सदर पदार्थ कोणत्या मार्गाने पोहोचतात आणि पोलीस यंत्रणा त्यांना आळा का घालू शकत नाही हा असा प्रश्न लोकांकडून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. या विषयावर कडक धोरण हाती घ्यावे, अशी मागणी कुडचडेतील लोकांकडून होत आहे.